अफगाणिस्तानला तालिबानीस्तान होऊ देणार नाही !
अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची चेतावणी
पंजशीर (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानात तालिबानची दहशत असली, तरी तालिबान्यांना पंजशीर प्रांतावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांना स्पष्ट शब्दांत चेतावणी देतांना, ‘पंजशीरमधील नागरिक तालिबानला तोडीस तोड उत्तर देतील. आम्ही अफगाणिस्तानला ‘तालिबानीस्तान’ बनू देणार नाही’, असे म्हटले आहे. अमरुल्ला सालेह सध्या पंजशीरमध्ये आहेत. अहमद मसूद यांना ‘नॉर्दन अलायन्स’ (उत्तरेतील मित्रपक्ष) ही अफगाणिस्तानला मुक्त करण्यासाठी कार्यरत असलेली सशस्त्र संघटना मोलाची साथ देत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला कार्यकारी राष्ट्रपती घोषित केले आहे. आम्हाला शांतता हवी आहे; पण तालिबानला लढाई करायची असेल, तर आम्हीही सिद्ध आहोत, असेही सालेह यांनी सांगितले.