पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी ! – डॉ. कादंबरी बलकवडे, महापालिका प्रशासक, कोल्हापूर
अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. त्यामुळे प्रशासनाने अशास्त्रीय आवाहन करण्याऐवजी धर्मशास्त्र काय सांगते, त्यानुसार आवाहन करणे अपेक्षित आहे !
कोल्हापूर – घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जनाला पंचगंगा नदीत बंदी असून इराणी खणीत विसर्जन होणार आहे. ८१ प्रभागांत १६० कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले जाणार आहे. येथे अर्पण होणार्या मूर्ती इराणी खणीत विसर्जनाला नेण्यासाठी २५० ट्रॅक्टर आणि टेंपो असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून गणेशोत्सवाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना आल्या असून त्याची कार्यवाही होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा. घरगुती श्री गणेशमूर्ती २ फूट, तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती ही ४ फूट असावी. उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच स्वच्छता स्पर्धाही घेतली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. कळंबा, मोरेवाडी येथील मंडळांनी त्यांच्या परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे.’’ (प्रशासनाने गणेशोत्सव आध्यात्मिक असल्याने भाविक आणि मंडळे यांनी तो तसा साजरा करण्याचे आवाहन करणे अपेक्षित आहे. अन्य धर्मियांच्या प्रत्येक सणाला प्रशासन तो पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी आवाहन करते काय ? आणि करत असल्यास त्याची काटेकार कार्यवाही होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात काय ? असे नागरिकांना वाटल्यास नवल ते काय ? – संपादक)