आतंकवादाच्या विरोधातील भारताच्या लढ्याची माहिती देणारे पुस्तक ‘ऑपरेशन ट्रॉजन हॉर्स’चे प्रकाशन

नवी देहली – माजी आय.पी.एस्. अधिकारी डी.पी. सिन्हा आणि शोध पत्रकार अभिषेक शरण यांनी लिहिलेले ‘ऑपरेशन ट्रॉजन हॉर्स’ हे पुस्तक हार्परकॉलिन्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेले आक्रमण, तसेच लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेने भारताविरुद्ध केलेल्या कारवाया यांची माहिती देण्यात आली आहे.

हार्परकॉलिन्स प्रकाशन संस्थेचे कार्यकारी संपादक सिद्धेश इनामदार या पुस्तकाविषयी म्हणाले, ‘‘पुस्तकात दिलेली माहिती स्फोटक आणि थरारक आहे. पुस्तकातून भारताने आतंकवादाच्या विरोधात आत्मविश्वासाने दिलेल्या लढ्याची माहिती मिळते.’’

भारतासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या विरांना (गुप्तहेरांना) हे पुस्तक समर्पित !

शोध पत्रकार अभिषेक शरण हे गेली २० वर्षे भारतावर झालेल्या आक्रमणांविषयी अभ्यास आणि वार्तांकन करत आहेत. डी.पी. सिन्हा यांनी गुप्तहेर खात्याचे विशेष संचालक, तसेच सुरक्षा सचिव म्हणून काम पाहिले आहे. या पुस्तकाविषयी सिन्हा म्हणाले, ‘‘मी सहभाग घेतलेल्या आतंकवादाच्या विरोधातील अनेक मोहिमांमधून मला पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. हे पुस्तक माझ्या अनुभवांवर आधारित आहे. ज्या अनेक अनामिक गुप्तहेरांनी काम करत असतांना भारतासाठी सर्वस्व अर्पण केले, त्या विरांना हे पुस्तक समर्पित आहे.’’

काय होती ‘ऑपरेशन ट्रॉजन हॉर्स’ मोहीम ?

आतंकवाद्यांची आक्रमणे परतवण्यासाठी भारतीय सुरक्षादलातील अनेकांना प्राण धोक्यात घालावे लागले, तसेच अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्ष १९९६ मध्ये लष्कर-ए-तोयबाचा १६ वर्षांच्या आत्मघाती आतंकवाद्याने पाकिस्तानमधून भारतात प्रवेश केला होता. जेव्हा आतंकवादविरोधी पथकातील शेखर सिंह या अधिकार्‍याने त्याला पकडले, तेव्हा त्याच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली होती. लष्कर-ए-तोयबाकडून भारतात नागरिक म्हणून स्थायिक होण्यासाठी आतंकवाद्यांना पाठवण्यात येत होते. भारतात कारवाया करून भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी या माणसांचा उपयोग करण्यात येणार होता. शेखर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याविरोधात लढा द्यायचे ठरवले. लष्कर-ए-तोयबाच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी ५ भारतीय गुप्तहेरांना पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये भाग घेण्यासाठी पाठवण्यात आले. त्यातूनच ‘ऑपरेशन ट्रॉजन हॉर्स’ ही आतंकवादाच्या विरोधात असलेली मोहीम जन्माला आली. अनेक वर्षे ही मोहीम चालू होती.