कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमीष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक !
पुणे – कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्रीचा व्यवसाय आणि मुंबई महापालिकेत साहित्य पुरवण्याचे काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची ‘बॉम्बे ट्रेडर्स’ने फसवणूक केल्याची घटना घडली. याविषयी व्यावसायिकाने येथील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानुसार ‘बॉम्बे ट्रेडर्स’च्या मालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
व्यावसायिकाने बॉम्बे ट्रेडर्सच्या मालकाच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी २२ लाख ४४ सहस्र रुपये जमा केले; मात्र पैसे घेऊनही साहित्य पुरवण्याचे काम न मिळाल्याने व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.