शिरापूर (सोलापूर) येथील शेतकर्याने मागितली गांजा लागवडीची अनुमती !
भारतासारख्या कृषीप्रधान देशात हमीभाव न मिळाल्याने गांजाची शेती करण्याची अनुमती मागण्याची वेळ येते यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक
सोलापूर, २६ ऑगस्ट – शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, शेती परवडत नाही. ऊस लावला, तर पाण्याअभावी वाळून जातो; अन्यथा देयक मिळत नाही. कोणतेही पीक घेतले, तरी बाजारात त्याला दर मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल आबाजी पाटील या शेतकर्याने स्वतःच्या मालकीच्या २ एकर शेतात गांजाची लागवड करण्याची अनुमती मागणारे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहे. गांजाच्या लागवडीस कायद्याने बंदी असून या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. (एकीकडे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पण करत असतांना शेतीमालाला भाव न मिळणे आणि अन्य अडचणी यांमुळे बंदी असलेल्या गांजाची शेती करण्याची अनुमती करण्याची मागावी लागते, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
अनिल पाटील या शेतकर्याने याची एक प्रत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे. गांजाला चांगला भाव मिळतो, त्यामुळे त्याची लागवड करण्यासाठी १५ सप्टेंबरअखेर लेखी अनुमती देण्यात यावी; अन्यथा १६ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाकडून अनुमती मिळाली, असे गृहीत धरून मी लागवड चालू करणार आहे. या संदर्भात माझ्यावर गुन्हा नोंद झाल्यास त्याचे दायित्व प्रशासनाचे राहील, असे त्या पत्रात म्हटले आहे.