लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने गुलामीची मानसिकता लादली ! – साध्वी प्रज्ञा सिंह, खासदार, भाजप
पुणे, २६ ऑगस्ट – इंग्रज अधिकारी लॉर्ड मेकॉलेने भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली. त्यांनी लादलेल्या नवीन शिक्षणपद्धतीतून गुलामीची मानसिकता लादली गेली, इंग्रजांनी त्यांच्या व्यवहारातून आणि शिक्षणपद्धतीतून ‘फूट पाडा आणि राज्य करा’, या तंत्राचा अवलंब केला, अशी टीका भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केली. एम्.आय.टी. विद्यापिठाच्या वतीने आयोजित ‘ओव्हरकमिंग द कोलोनियल माईंडसेंट’ या वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद वाढला. भारतातील वर्णव्यवस्था कर्माच्या आधारे निश्चित केली होती. इंग्रजांनी येऊन जातीच्या आधारे फूट पाडली. आता आपल्याला जातीभेद मिटवून समरस होऊन पुढे यायला हवे.’’
त्या पुढे म्हणाल्या की, मध्यप्रदेशच्या एका माजी मुख्यमंत्र्याने भगवा आतंकवाद हा शब्द जन्माला घालण्यासाठी मुंबई गाठली. भारताला पवित्र असलेल्या भगवा, संन्यासी आणि सैनिक यांना त्यांनी अपकीर्त केले, असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचे नाव न घेता केला.