पुणे येथील ‘हातकागद संस्थे’च्या वतीने अशास्त्रीय कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती !
कागद पाण्यात मिसळल्यावर मिथेन नावाचा विषारी वायू सिद्ध होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. मातीची मूर्ती असावी, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे भाविकांनी श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शास्त्रानुसार योग्य अशी शाडूमातीचीच मूर्ती घ्यावी. – संपादक
पुणे, २६ ऑगस्ट – रसायन तंत्रज्ञान संस्था (आय.सी.टी.) यांनी केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलोची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते. त्या आधारे पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी आणली आहे. तरी काही संघटना त्याचे उदात्तीकरण करतात. त्याच प्रकारे पुण्यातील हातकागद संस्थेच्या वतीने ९० टक्के हातकागदाचा लगदा आणि १० टक्के शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (कि पर्यावरणास अपायकारक ?) श्री गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने ३ प्रकारांमध्ये या ९ इंचांच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक रंगांचा वापर करत बनवलेल्या मूर्ती, केशरी रंगातील सोनेरी ‘डिझाइन’ असलेल्या मूर्ती आणि लहान मुलांना स्वत:च्या हाताने रंगवता येण्यासाठी पांढर्या रंगातील मूर्ती यांचा समावेश आहे. हातकागदापासून सिद्ध केलेल्या या मूर्तींचे पाण्याच्या बादलीत विसर्जन केल्यानंतर त्या सहज विरघळून जातात. शिवाय पुन्हा कागद्याच्या लगद्यामध्ये रूपांतर करून त्यांचा पुनर्वापरही करता येऊ शकतो.
याविषयी सांगली येथील पर्यावरणतज्ञ सुब्बाराव यांनी सांगितले की, या कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. तसेच पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते.