गोव्यात काँग्रेससाठी पोषक वातावरण असून निवडणुकीत लोकहित सांभाळणारे उमेदवार उभे करणार ! – पी. चिदंबरम्
काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांचा गोवा दौरा
पणजी, २६ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे आणि काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत लोकहित सांभाळणारे उमेदवार उभे करणार आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् सध्या दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही आगामी निवडणुकीत पक्षाशी प्रामाणिक असलेले, आपल्या विचारसरणीवर विश्वास असलेले, कठोर परिश्रम करू इच्छिणारे आणि जनहित पहाणारे उमेदवार निवडणार आहोत. या वेळेला निवडणुकीच्या खूप पूर्वीच उमेदवार घोषित केले जाणार आहेत. काँग्रेसचा पाठिंबा असलेले सर्व उमेदवार ४० ही मतदारसंघांत निवडून येणार आहेत. निवडणुकीविषयीचा प्रत्येक निर्णय युवक काँग्रेस, ‘एन्एस्यूआय’ ही विद्यार्थी संघटना, महिला काँग्रेस, सेवा दल, अल्पसंख्यांक विभाग, पक्षाचे इतर विभाग आणि पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन घेतला जाणार आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात पालट करणे किंवा पक्षाने निवडणुकीसाठी आघाडी निर्माण करणे, ही सूत्रे सध्या गौण आहेत, तर निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जाण्यासाठी सिद्धता करणे महत्त्वाचे आहे.’’