भारतीय उपखंडातील भारत हा महत्त्वाचा देश ! – तालिबान

भारत हा भारतीय उपखंडातील महत्त्वाचा देश आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे तालिबानने असे केवळ बोलून न थांबता स्वतःच्या मर्यादेत रहावे; कारण भारत जर आक्रमक झाला, तर त्याची काय स्थिती होईल, याचा त्याने विचार करावा ! – संपादक

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद

काबुल (अफगाणिस्तान) – आम्हाला सगळ्याच देशांसमवेत चांगले संबंध स्थापित करण्याची इच्छा आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारत हा भारतीय उपखंडातील (या उपखंडात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.) महत्त्वाचा देश आहे. भारताने अफगाणी जनतेच्या इच्छेप्रमाणे स्वतःचे धोरण आखावे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरोधात करू दिला जाणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘ए.आर्.वाय.’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेट ही संघटना जवळपास संपुष्टात आली आहे, अशी माहितीही त्याने दिली.

जबीउल्ला याने पुढे म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांनी द्विपक्षीय चर्चेतून वादावर तोडगा काढावा. काश्मीरच्या सूत्रावर भारताने त्याची भूमिका सकारात्मक करायला हवी. (भारताला फुकाचा सल्ला देणारे तालिबानी आतंकवादी ! अशांची बोलती बंद करण्यासाठी भारताने आक्रमक व्हावे ! – संपादक)