काबुल विमानतळावर पाण्याची बाटली ३ सहस्र रुपयांना, तर जेवण साडेसात सहस्र रुपयांना !
अफगाणिस्तान सोडून जाणार्या नागरिकांची काबुल विमानतळावरील दुःस्थिती !
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्यानंतर सहस्रो अफगाणी नागरिक देश सोडण्याच्या सिद्धतेत आहेत. सहस्रोंच्या संख्येने लोक काबुल विमानतळावर परदेशात जाण्यासाठी वाट पहात आहेत. काबुल विमानतळावर जमलेल्या या लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. भीतीसह विमानामधून जाण्याचा क्रमांक येईपर्यंत पाणी, भूक आणि विश्रांती यांच्याशी त्यांना झगडावे लागत आहे. येथे खाद्यपदार्थांचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याच्या एका लिटरच्या बाटलीसाठी ४० अमेरिकी डॉलर्स म्हणजे अनुमाने ३ सहस्र भारतीय रुपये आणि जेवणासाठी १०० डॉलर्स म्हणजे अनुमाने साडे सात सहस्र भारतीय रुपये मोजावे लागत आहेत. यासमवेतच अफगाणी चलनाद्वारे नव्हे, तर अमेरिकी डॉलर्समध्ये ते द्यावे लागत आहेत.
काबुल विमानतळाबाहेरील गुडघ्यापर्यंत घाणेरडे पाणी असलेल्या नाल्यामध्ये, तसेच कचर्यामध्ये लोक त्यांचा क्रमांक येण्याची वाट पहात उभे आहेत. गर्दी प्रचंड वाढत आहे. यामुळे महिला आणि मुले यांची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.
काबुल एयरपोर्ट के बाहर खाने-पीने की वस्तुएं कई गुना ज्यादा दामों में बिक रही हैं.#KabulAirport #Afghanistan #Talibanhttps://t.co/N3FbKFzuDH
— Zee News (@ZeeNews) August 26, 2021
प्रत्येक ३ अफगाणी नागरिकांपैकी एक जण भुकेला ! – अहवाल
‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’च्या एका अहवालानुसार अफगाणिस्तानमध्ये पिके नाहीत, पाऊस नाही, पिण्याचे पाणी नाही, तसेच लोक गरिबीत जगत आहेत. प्रत्येक ३ अफगाणी नागरिकांपैकी १ म्हणजे अनुमाने १ कोटी ४० लाख लोक भुकेले आहेत. यासमवेतच २० लाख मुले कुपोषित आहेत आणि त्यांना त्वरित साहाय्याची आवश्यकता आहे.