प्रेमभाव आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. क्रांती दशरथ राऊत (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. क्रांती दशरथ राऊत एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कु. क्रांती दशरथ राऊत हिचा आज श्रावण कृष्ण पक्ष चतुर्थी (२६.८.२०२१) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या मावशीला तिच्यात जाणवलेले पालट आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कु. क्रांती दशरथ राऊत हिला अकराव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रगल्भता
‘कु. क्रांतीची प्रगल्भता पुष्कळ वाढली आहे’, असे जाणवते. तिचे दृष्टीकोन आणि शब्दसुद्धा प्रगल्भ अन् उच्च स्तरावरील असतात.
२. मावशीच्या वाढदिवसाची सिद्धता करून तिला आश्चर्यचकित आणि आनंदी करण्यासाठी धडपडणारी प्रेमळ क्रांती !
क्रांतीचे वडील २ दिवसांकरता देवद आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी क्रांतीही त्यांच्यासमवेत आली होती. ती आली, त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तिने घरून निघतांना सर्वांशी बोलून माझ्यासाठी पोशाख आणला होता. एका खोक्यात तो पोशाख घालून त्यावर तिने माझे चित्र काढले आणि फुले काढून ‘माझ्यावर पुष्पवृष्टी होत आहे’, असे दाखवले, तसेच त्या खाली ‘वाढदिवसानिमित्त नमस्कार !’ असे लिहिले. तिने ‘याविषयी मला काही कळू नये’, यासाठी तिचे वडील, घरातील सदस्य आणि आश्रमातील साधक या सगळ्यांना सांगून ठेवले होते.
वाढदिवसाच्या दिवशी तिने ते अकस्मात् मला देऊन आश्चर्यचकित केले. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.
३. स्वतःला पालटण्याची तळमळ
३ अ. सांगितल्यानुसार प्रयत्न करणे : मागील वेळी क्रांती आश्रमात आली होती. तेव्हा ती साधकांशी बोलत नव्हती. कुणी तिला काही विचारले, तर लाजून शांत बसायची. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘तू सर्वांशी बोलायला हवेस. साधक किती प्रेमाने तुझ्याशी बोलतात ! तूही त्यांच्याशी बोलायला हवे.’’ या वेळी ती आश्रमात आल्यावर सर्वांशी मोकळेपणे बोलत होती. तिच्यामध्ये आधीच्या तुलनेत पुष्कळ सहजता जाणवली. तिने स्वतःत पुष्कळ पालट केल्याचेही जाणवले.
३ आ. स्वतःच्या चुका ऐकून घेणे : पूर्वी तिच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना व्यष्टी साधनेचा किंवा तिच्याकडून झालेल्या चुकांचा विषय काढला की, ती काही बोलत नसे किंवा ती तिच्या आईकडे भ्रमणभाष देत असे; पण आता ती साधनेविषयी बोलते. ती तिच्या चुकाही शांतपणे ऐकून घेते. यावरून ‘तिची साधना पुष्कळ चांगली चालू आहे’, असे वाटते. तेव्हा ‘पालटण्याची तळमळ असेल, तर देवच साहाय्य करून अल्पावधीत पालट घडवतो’, हे माझ्या लक्षात येऊन मला कृतज्ञता वाटली.
४. सद्गुरु आणि संत यांच्याप्रती असलेला भाव
४ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना भेटण्याची ओढ असणे : क्रांतीला सद्गुरु राजेंद्रदादांविषयी पुष्कळ ओढ आहे. आश्रमात आल्यावर ‘कधी एकदा त्यांना भेटते’, असे तिला होते. ती त्यांनी सांगितलेले प्रयत्न कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती मला भ्रमणभाषवर एक-दोन दिवसांनी तिच्या साधनेच्या आढाव्याचा लघुसंदेश करते.
४ आ. पू. (सौ.) अश्विनीताईंचा वाढदिवस साजरा करतांना क्रांतीची भावजागृती होणे : पूर्वी एकदा ती देवद आश्रमात आली होती. तेव्हा पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस होता. तेव्हा आम्ही त्यांना कृतज्ञतापत्र देत असतांना क्रांतीही तेथे उपस्थित होती. हे सर्व पहात असतांना तिची भावजागृती होत होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि तोंडवळ्यावरही पुष्कळ वेगळा भाव जाणवून ती वेगळ्याच स्थितीत होती. तेव्हा पू. अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘ती वेगळ्याच स्थितीत असते. आपल्यामध्ये असून नसल्यासारखी वाटते.’’
५. स्वतःला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील सदस्य समजणे
क्रांतीने इंग्रजीमध्ये ‘माय आठवले फॅमिली’ (‘My Aathavale Family’) असा एक निबंध लिहिला आहे. यामध्ये, ‘माय नेम इज क्रांती आठवले. माय मदर्स नेम इज जयंत आठवले. माय फादर्स नेम इज कृष्ण आठवले.’ असे सर्व नातेवाईक, बहीण, भाऊ, आजी, आजोबा यांना देवी-देवतांची नावे लिहून त्या खाली ‘माय आठवले फॅमिली’ असे लिहिले होते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळे आम्हाला या उच्च लोकातील जिवाचा सहवास मिळून तिच्याकडून शिकण्याची संधी मिळत आहे. ‘या दैवी बालकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आमच्याकडून कृतीत येऊ देत आणि आमच्यातही या बालकांप्रमाणे पालटण्याची तीव्र तळमळ निर्माण होऊ दे. यासाठी तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सोनाली गायकवाड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (कु. क्रांतीची मावशी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.३.२०१८)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |