साधकांनो, ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के होत नाही’, असा विचार करून निराश न होता ‘मी निश्चितच आध्यात्मिक प्रगती करू शकणार आहे’, असे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना देऊन साधनेचे प्रयत्न वाढवा !
‘काही साधकांना ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के का होत नाही ?’, असा विचार येऊन निराशा येते. अशा साधकांनी हे लक्षात घ्यावे, ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी पूर्वजन्मीची साधना, संचित, प्रारब्ध, भाव, तळमळ, अनिष्ट शक्तींचा त्रास, स्वभावदोष, अहं, वर्षभरातील साधनेचे प्रयत्न आदी अनेक घटक कारणीभूत असतात. एखाद्या साधकाचे प्रारब्ध अधिक असेल, तर त्याच्या उन्नतीला वेळ लागतो; कारण प्रारब्ध संपवण्यासाठी त्याची साधना वापरली जाते. त्याने निरपेक्षतेने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास योग्य वेळ आल्यावर त्याची निश्चितच आध्यात्मिक प्रगती होते.’
साधकांनी आध्यात्मिक पातळीच्या विचाराने निराश न होता पुढील प्रयत्न करावेत.
१. ‘अन्य साधक आध्यात्मिक प्रगती करू शकतात, तर मीही निश्चितच प्रगती करणार आहे’, हे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना द्यावी.
२. ‘मी साधनेत कुठे उणे पडतो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करावा. आपले साधक-कुटुंबीय आणि सहसाधक यांचे साधनेत साहाय्य घ्यावे. ‘आपल्या साधनेची दिशा योग्य आहे का ?’, याविषयी व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे, तसेच उत्तरदायी साधक यांना विचारावे.
३. आपल्या संपर्कातील ६० टक्के किंवा त्यापुढील आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांमध्ये ‘कोणते गुण आहेत ? त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे जाणून घेऊन त्या दृष्टीने स्वतः प्रयत्न करावेत.
४. ‘सनातन प्रभात’मध्ये ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांची गुणवैशिष्ट्ये, तसेच संतांचे साधनाप्रवास यांविषयीचे लेख प्रसिद्ध होतात. त्यांचा अभ्यास करून ते गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.
गुरुदेवांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्यामुळे या आपत्काळातही साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे. त्यामुळे साधकहो, प्रगती होण्याची चिंता करू नका, तर श्री गुरुदेवांवर अढळ निष्ठा ठेवून प्रयत्नरत रहा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)