हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना जळगाव येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१.३.२०२० या दिवशी जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्याचा प्रसार करतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांकडून मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय येथे दिले आहेत.

श्री. विनोद शिंदे, जळगाव

शारीरिक त्रास होत असतांनाही सेवा करता येणे आणि गुडघा दुखत असतांनाही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करता येणे

‘सभेच्या प्रचाराला प्रारंभ झाल्यानंतर माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यात असह्य वेदना होऊ लागल्या. मला उभेही रहाता येत नसल्याने घराबाहेर पडून सभेचा प्रसार करणे अशक्य होते. मी आधुनिक वैद्यांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात गेलो. त्यांनी पायाची क्ष-किरण (एक्स-रे) चाचणी करायला सांगितली. त्याचा अहवाल सर्वसामान्य होता. आधुनिक वैद्यांनी मला १५ दिवस विश्रांती घ्यायला सांगितली आणि नंतर ‘एम्.आर्.आय.’ स्कॅन ही चाचणी करायला सांगितली. सभेला काही दिवसच शेष असल्याने पायाला वेदना होत असतांनाही मी सेवेला बाहेर पडायचो. त्या वेळी मला केवळ गुरुकृपेमुळे सेवा करता आली.’ (मार्च २०२०)

सौ. आरती कोमटी, जळगाव

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना एका ठिकाणी बसल्यावर सर्व साधिकांना गुलाबाचा सुगंध येणे आणि जवळच्या घरातील एका मुलीने गुलाबाचे फूल मागणे

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार करतांना आम्ही सर्व साधिका एका ठिकाणी बसून स्वयंसूचना सत्र करत होतो. त्या वेळी मी बाटलीतील पाणी सर्वांना प्यायला दिले. तेव्हा त्या पाण्याला गुलाबाचा सुगंध येत होता. मी सर्वांना याविषयी विचारले, तर त्यांनाही गुलाबाचा सुगंध येत होता. सर्व साधकांनी सुगंध घेतल्याने त्यांना आलेला थकवा दूर होऊन उत्साह जाणवू लागला. काही मिनिटांनी जवळच्या घरातील एक लहान मुलगी आमच्याजवळ येऊन ‘मला गुलाबाचे फूल द्या ना’, असे म्हणू लागली. त्यामुळे आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले.’

२. अनोळखी व्यक्तींवर भुंकणार्‍या कुत्र्याने प्रसारासाठी गेलेल्या साधकांवर न भुंकणे

एकदा आम्ही साईप्रसाद कॉलनीत प्रसार करत होतो. तेव्हा एका घरासमोर कुत्रा बांधलेला होता. आम्ही त्याला नमस्कार केला आणि घरमालकाला बोलावून हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती दिली. त्यांनी आम्हाला अर्पण दिले. त्या वेळी घरातील महिला बाहेर आली आणि म्हणाली, ‘‘आमचा हा मोती (कुत्रा) तुमच्यावर भुंकला कसा नाही ? तो कुणालाही जवळ येऊ देत नाही आणि पैसेही देऊ देत नाही.’’ आम्ही त्या महिलेला साधना आणि नामजप यांविषयी सांगितले.’ (मार्च २०२०)

सौ. रोशनी निकम, पिंप्राळा, जळगाव

सेवेला बाहेर पडल्यावर पोटातील तीव्र वेदना थांबणे आणि आनंद मिळणे : ‘एकदा माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या; म्हणून मी रुग्णालयात जाऊन आधुनिक वैद्यांना दाखवून उपचार केले, तरी माझ्या पोटात दुखतच होते. मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि सेवेला बाहेर पडले. सेवा करत असतांना मी मधे मधे अत्तर आणि कापूर यांचे उपाय करत होते. माझा अखंड नामजप चालू असायचा. सेवा करतांना मला पोटात दुखायचे नाही आणि सेवेत आनंदही मिळायचा.’ (मार्च २०२०)

श्री. पंकज बागुल, धुळे

१. समाजातील व्यक्तींनी साधकांचे आदरातिथ्य करणे

१ अ. ‘साधकांनी घरी यावे’, अशी इच्छा असलेली एक महिला ! : ‘मेहरुन येथे प्रसार चालू असतांना एका महिलेने आम्हाला आग्रहाने घरी बोलावले आणि चहा दिला. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी येता. तेव्हापासून माझी इच्छा होती की, तुम्ही माझ्या घरी यावे. माझी ती इच्छा स्वामी समर्थांनी पूर्ण केली.’’ त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर कृतज्ञताभाव दिसत होता.

१ आ. साधक प्रसाराला येणार; म्हणून महिलेने घरी थांबणे आणि साधकांना सरबत देणे : एका साधकाने ते पूर्वी रहात असलेल्या ठिकाणच्या ओळखीच्या एका महिलेला सांगितले की, आम्ही उद्या तिकडे सभेच्या प्रसाराला येणार आहोत. दुसर्‍या दिवशी त्या भागात प्रसाराला गेल्यावर त्या महिलेने सेवा करणार्‍या २२ साधिकांसाठी सरबत केले. त्या म्हणाल्या, ‘‘आज तुम्ही येणार; म्हणून मी कुठेही बाहेर गेले नाही. मला तुमची सेवा करण्याची इच्छा होती.’’

२. सद्गुरु जाधवकाकांना पाऊस येण्याच्या शक्यतेविषयी सांगितल्यावर वातावरण लगेच पूर्ववत् होणे

सभेच्या आदल्या दिवशी सायंकाळी आकाशात काळे ढग जमा झाले आणि वारा वेगाने वाहू लागला. त्या वेळी ‘काही वेळात पाऊस पडणार’, असे वाटत होते; म्हणून सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांना भ्रमणभाष करून येथील स्थिती सांगितली. त्यानंतर ३ मिनिटांतच सर्व ढग नाहीसे झाले. वारा थांबला आणि वातावरण पूर्ववत् झाले.’ (मार्च २०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.