पंढरपूर (जिल्हा सोलापूर) तालुक्यातील २१ गावांत १४ दिवस दळणवळण बंदी घोषित !

१० हून अधिक रुग्णसंख्या असलेले गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोनाबाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या अधिक असणार्‍या २१ गावांत १४ दिवस दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ज्या गावांत १० किंवा १० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागांतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेच्या संदर्भात सांस्कृतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी उपस्थित होते. या वेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले की, दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद रहातील. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, फळे, भाजीपाला विक्रेते आणि दूध विक्रेते यांच्यासह अन्य व्यावसायिकांची सप्ताहातून एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.