व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्या, साधकांची आईच्या मायेने काळजी घेणार्या अन् गुरुदेवांप्रती भाव असणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) !
सौ. मनीषा पाठक
(६८ टक्के आध्यात्मिक पातळी), पुणे
१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘माझी आणि शिल्पाताईंची आध्यात्मिक मैत्री आहे. आम्ही एकमेकींशी मोकळेपणाने बोलतो. मागील वर्षापासून शिल्पाताईंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य आहे. ताई नियमितपणे व्यष्टी साधनेचा आढावा प्रांजळपणे देतात. त्यांचे ‘स्वतःच्या मनाचा झालेला संघर्ष आणि ‘साधनेत कुठे अल्प पडते ?’, याचे अचूक निरीक्षण असते. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सांगत असलेले साधनेचे प्रयत्न त्या प्रामाणिकपणे करतात.
२. ताईंच्या यजमानांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर त्यांनी कुटुंबातील दायित्वाच्या गोष्टी आणि साधना यांचे सकारात्मक राहून नियोजन करणे : ऑगस्ट २०२० मध्ये ताईंच्या यजमानांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ताईंनी ‘यजमानांचे आजारपण, घर आणि वैद्यकीय महाविद्यालय यांचे दायित्व अन् व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन’, अशा सर्वच स्तरांवर सकारात्मक राहून प्रयत्न केले.
३. ताईंनी त्यांच्या मुलावर साधनेचे संस्कार केले आहेत. त्या दोघांनाही एकमेकांचा आधार वाटतो.
४. ताईंच्या यजमानांच्या निधनानंतर त्यांनी लगेच सेवेला आरंभ करणे : ताई स्वतः आधुनिक वैद्या असल्याने यजमानांचे निधन होण्यापूर्वी त्यांना यजमानांच्या कठीण स्थितीविषयी समजले होते. त्यांनी मला त्यांच्या यजमानांच्या स्थितीविषयी लघुसंदेश पाठवून कळवले आणि त्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच त्यांच्या यजमानांचे निधन झाले. त्या रात्रीपासूनच त्यांनी सेवेला आरंभ केला. यजमानांच्या निधनानंतर तिसर्या दिवसापासूनच ताई नियमितपणे व्यष्टी साधनेचा आढावा देऊ लागल्या.’ (१७.७.२०२१)
कु. वैभवी सुनील भोवर
(आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१. प्रेमभाव : ‘शिल्पाताई म्हणजे प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहे. आईचे जसे आपल्या मुलांवर प्रेम असते, तसे त्या साधकांवर निरपेक्ष प्रेम करतात. ताई ‘इतरांशी स्वतःहून बोलणे, इतरांच्या मनाची स्थिती जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे’ इत्यादी कृती सहजतेने करतात. त्यामुळे साधकांना ताईंचा आधार वाटतो.
२. ‘नेतृत्वगुण, प्रेमभाव, भाव, श्रद्धा इत्यादी गुणांमुळे ताईंची आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे मला वाटते.’ (१७.७.२०२१)
कु. दीपाली मतकर
(आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
१. प्रेमभाव : ‘मी ३ वर्षांपूर्वी आजारी असल्याने रुग्णालयात भरती होते. तेव्हा ताई मला भेटण्यासाठी कोल्हापूरहून सोलापूर येथे रुग्णालयात आल्या होत्या. त्या मला रामनाथी आश्रमात पोचवण्यासाठीही वेळ काढून आल्या होत्या.
२. ताई पूर्वी कार्यरत असलेल्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्या मनात ताईंविषयी आदर अन् कृतज्ञता असणे : मी ज्या रुग्णालयात भरती होते, त्याच रुग्णालयात ताई १० वर्षांपूर्वी आधुनिक वैद्या म्हणून कार्यरत होत्या. ताई रुग्णालयात आल्याचे कळल्यावर त्यांच्या काळातील तेथील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि कर्मचारी त्यांच्याभोवती गोळा झाले. त्या सर्वांना ताईंना पाहून पुष्कळ आनंद झाला. त्यांना ताईंविषयी पुष्कळ आदर आणि आधारही वाटत होता. ‘ताईंमुळे आम्हाला साधना समजली’, असे तेथील परिचारिका पुष्कळ कृतज्ञतेने सांगत होत्या.
३. ताई ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त शिबिरार्थींच्या वयाला अनुसरून सोप्या पद्धतीने विषय मांडतात.
४. इतरांचा विचार करणे : ताई सतत सेवारत असतात. मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर त्या व्यस्त असतील, तर त्या मला लघुसंदेश पाठवून लगेच प्रतिसाद देतात.
५. अभ्यासू वृत्ती : मी काही वर्षांपूर्वी सद्गुरु स्वातीताईंच्या (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या) समवेत एका जाहीर सभेच्या सेवेसाठी गेले होते. त्या वेळी मला शिल्पाताईंकडून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी ‘सभेच्या वेळी कशी बैठक व्यवस्था केल्यात किती जण बसतील ?’, हे पुष्कळ आत्मविश्वासाने सांगितले.
६. त्यांनी सभा संपल्यावर स्वयंपाकघरात आवरण्याच्या सेवेत साहाय्य केले.
७. प्रोत्साहन देणे : साधकांनी लहानशी कृती केली, तरी त्या लगेच कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्या साधकांचा प्रयत्न करण्याचा उत्साह पुष्कळ वाढतो.
८. साधकांना साधनेत साहाय्य करणे : ताईंना सेवा किंवा व्यष्टी साधना यांविषयी कधी काही अडचण सांगितली, तर त्या मला प्रेमाने साहाय्य करतात. त्या वेळी ‘मी कसे असायला हवे ? त्या प्रसंगात माझी साधना कशी होणार ? मला काय शिकायचे आहे ?’, हे त्या पुष्कळ प्रेमाने आणि तत्त्वनिष्ठ राहून सांगतात.
९. भाव
९ अ. श्रीकृष्णाप्रती भाव : शिल्पाताई आम्हाला श्रीकृष्ण आणि गोपी यांच्याविषयी त्यांना आलेल्या अनुभूती सांगतात. तेव्हा अनेक वेळा आम्हाला ‘आम्ही गोपींच्या वेशात श्रीकृष्णाच्या समवेत वृंदावनात आहोत’, अशी अनुभूती येते. त्या वेळी शिल्पाताईंचा भाव जागृत होतो.
९ आ. गुरुदेवांप्रतीचा भाव : गुरुदेवांविषयी बोलू लागल्यावर ताईंची पुष्कळ भावजागृती होते. त्यांना ‘कठीण प्रसंगात स्थिर कसे रहाता ?’, असे विचारल्यावर त्या सांगतात, ‘‘केवळ गुरुदेवांचीच कृपा !’’ त्या असे सांगत असतांनाही त्यांच्या बोलण्यात गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवतो.’ (१७.७.२०२१)
वर्षा कुलकर्णी, सोलापूर
साधिका दातांच्या उपचारांसाठी ताईंच्या रुग्णालयात गेल्यावर त्यांनी साधिकेची काळजी घेणे : ‘मला माझ्या दातांच्या उपचारांसाठी काही दिवस ताईंच्या रुग्णालयात जावे लागल्यावर माझा ताईंशी संपर्क आला. त्या कालावधीत शिल्पाताईंनी माझ्या उपचारांचे योग्य नियोजन करून ‘त्यानुसार उपचार होत आहेत ना ?’, याचा शेवटपर्यंत पाठपुरावा घेतला. त्यांनी या कालावधीत माझी सर्वतोपरी काळजी घेतली.’ (१७.७.२०२१)
कु. अनुराधा जाधव, गोवा
१. नम्रता : ‘शिल्पाताई प्रथितयश डॉक्टर आहेत; मात्र त्यांच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून तसे कधीच जाणवत नाही. त्यांच्यात पुष्कळ नम्रता आहे. त्या सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात.
२. श्रीमती शिल्पा कोठावळे यांच्यात जाणवलेले पालट :
अ. त्यांच्यातील ‘नम्रता, प्रेमभाव, स्वीकारण्याची वृत्ती, तळमळ, परिस्थितीवर मात करणे, इतरांचे कौतुक करणे’ इत्यादी गुणांमध्ये वाढ झाली आहे.
आ. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वृद्धींगत झाली आहे.’ (१७.७.२०२१)
डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट
१. चिकाटी
‘आई प्रतिदिन व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत सर्व सूत्रे चिकाटीने पूर्ण करते. तिला कामाची कितीही व्यस्तता असली, तरी ती व्यष्टी साधना पूर्ण करूनच अन्य कामे करते. काही वेळा साधकांकडून एखादी सेवा करायची राहिली, तर तिला त्याविषयी पुष्कळ खंत वाटते. आई ती सेवा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.
२. नेतृत्वगुण
तिच्यात उपजतच नेतृत्वगुण आहे. ‘प्रत्येक काम आणि सेवा पुढाकार घेऊन कशी करायची ?’, हे मी आईकडून शिकलो.
३. परिपूर्ण सेवा करणे
तिला प्रत्येक कृती परिपूर्ण करण्याची सवय आहे. ती प्रत्येक कृतीतील बारकावे काढते. ‘तीच्या नियोजनाचा इतरांना त्रास होणार नाही ना ?’, याकडे तिचे बारकाईने लक्ष असते.
४. साधकांना सेवेविषयी सूत्रे सांगतांना ‘साधकांची साधना कशी होईल ?’, अशी तिला तळमळ असते.
५. साधकाच्या आजोबांचे आणि वडिलांचे निधन झाल्यावर त्याच्या आईने स्थिर राहून सेवा अन् व्यावहारिक कामे करणे
ऑगस्ट २०२० मध्ये माझ्या आजोबांचे (डॉ. सुधाकर कोरे यांचे (आईच्या वडिलांचे)) निधन झाले. माझे आजोबा ‘तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालया’चे ‘चेअरमन’ होते, तसेच ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’चे प्रमुख होते. आजोबांचे निधन झाल्यावर आई साधनेच्या बळावर स्थिर राहून सेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय यांचे दायित्व समर्थपणे सांभाळत आहे. २९.६.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांचे (डॉ. नितीन कोठावळे यांचे) निधन झाल्यानंतर आई स्थिर राहून सेवा आणि अन्य व्यावहारिक कामे करत आहे.
६. आईमध्ये जाणवलेले पालट
अ. गेल्या ३ – ४ मासांपासून तिची चिडचिड न्यून झाली आहे. ती सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते.
आ. तिची काम आणि सेवा, असे दोन्ही करण्याची क्षमता वाढली आहे.
इ. तिच्यातील ‘इतरांना समजून घेणे आणि इतरांचा विचार करणे’, या गुणांत वाढ झाली आहे.
ई. आईतील श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या भावात वृद्धी झाली आहे.’
– डॉ. कौशल कोठावळे (मुलगा), कोल्हापूर (१७.७.२०२१)