मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी
सावंतवाडी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यात भाजपच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सावंतवाडी आणि कणकवली येथे भाजपच्या वतीने पोलीस ठाण्यांत देण्यात आले.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि ‘सामना’ दैनिकात आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध करणारे खासदार संजय राऊत यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.