विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी ग्रामपंचायत रणदेवीवाडी आणि कसबा सांगाव अशा ३५ जणांचे ठराव प्रशासनास सादर ! 

दोन्ही ग्रामपंचायतींतील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे यांचा उत्स्फूर्त सहभाग !

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन सादर करतांना हिंदुत्वनिष्ठ

कागल (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत रणदेवीवाडी आणि कसबा सांगाव येथील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे अशा ३५ जणांचे ठराव ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने २३ ऑगस्ट या दिवशी प्रशासनास सादर करण्यात आले. कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे हे ठराव सुपुर्द करण्यात आले. हे ठराव जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.

या वेळी शिवसेनेचे श्री. प्रभाकर थोरात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, भारतीय किसान संघाचे श्री. बाबय्या स्वामी, स्वामी समर्थ संप्रदायाचे श्री. अजय लोहार, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सर्वश्री दीपक माने, श्रेयस निकम, राजेंद्र भोजे उपस्थित होते.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विविध सहकारी संस्था आणि तरुण मंडळे यांनी ठराव करून विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीकडे दिले आहेत. हे सर्व ठराव या विषयाची तीव्रता लक्षात येण्यासाठी आपल्याकडे पाठवत आहोत. या ठरावांची नोंद घेऊन विशाळगडावरील अतिक्रमणे हटवावीत, तसेच ऐतिहासिक वास्तू आणि मंदिर यांचा जिर्णाेद्धार करावा.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीस सर्वतोपरी साहाय्य आणि समितीस पाठिंबा ! – ग्रामपंचायत रणदेवीवाडी यांचा ठराव

शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगड येथे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. हिंदूंच्या मंदिरांची दुरवस्था झालेली आहे. नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी साधी पायवाटही नाही. याविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती कार्य करत आहे. या कार्यास सर्वतोपरी साहाय्य करण्याविषयी, सविस्तर चर्चा आणि समितीस पाठिंबा देण्याविषयी कृती करण्यासाठी शासनाला कळवले आहे.

विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी भगवंतेश्वर मंदिरात मनसेच्या वतीने अभिषेक !

विशाळगड येथील भगवंतेश्वर मंदिरात अभिषेक करून झाल्यानंतर फुलांनी सजवलेली शिवपिंड

कोल्हापूर – विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी विशाळगड येथील भगवंतेश्वर मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी भगवंताच्या चरणी ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी तालुका सचिव रोहित जांभळे, विशाळगडचे मनसैनिक नीलेश हर्डीकर, प्रदीप वीर, सागर माने, प्रमोद पाटील, रोहित मोरे, आदित्य पाटील, आनंदा कळंत्रे यांसह अन्य जण उपस्थित होते.