नागपूर येथे ५ जणांचा ‘डेल्टा प्लस’ आजाराचा अहवाल आला कोरोनामुक्त झाल्यावर !
कोरोनाच्या काळात ‘डेल्टा प्लस’सारख्या गंभीर आजारांचा अहवाल वेळेत मिळण्यासाठी पाठपुरावा करून रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे. अहवाल वेळेत न आल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे हलगर्जीपणा न करता ‘डेल्टा प्लस’चे सूत्र गांभीर्याने घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने काम केले पाहिजे. – संपादक
नागपूर – जुलै मासात ‘डेल्टा प्लस’ आजाराची शहरातील ५ जणांना बाधा झाली होती. त्या कालावधीत ते कोरोनाबाधित होते; पण आता कोरोनातून बरे झाल्यावर त्यांचा ‘डेल्टा प्लस’चा अहवाल आला आहे. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेवर सध्या अहवाल पडताळणीचा पुष्कळ भार असल्याने अहवाल विलंबाने मिळाले आहेत.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अन् एक खासगी प्रयोगशाळा येथून या रुग्णांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
‘डेल्टा प्लस’शी मिळता-जुळता प्रकार आहे ! – डॉ. संजय चिलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी
‘‘५ रुग्णांच्या संपर्कातील काही नागरिकांना महापालिकेने गृह अलगीकरणात रहाण्यास सांगितल्याने ‘डेल्टा प्लस’ आजाराचा प्रसार झालेला नाही. नागूपर येथे कोरोनाचे आढळलेले नवीन रूप मूळ ‘डेल्टा प्लस’ नसून त्याच्याशी मिळता-जुळता प्रकार दिसत आहे. त्यातच शहरात प्रतिदिन आढळणारे नवीन रुग्ण पहाता तो गतीने पसरला नाही, हेही स्पष्ट झाले आहे’’, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.