पुण्यातील टेकड्यांचे तांत्रिक सर्वेक्षण कधी ?
गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन कोकणातील तळीये गाव मातीखाली गाडले गेले. त्यामुळे अपरिमित मनुष्यहानी झाली. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील टेकड्यांचा विषयही गंभीर होत आहे. पुण्यातील टेकड्यांवरील खडकांचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे ‘इथे असे होणार नाही, असे प्रशासनाला वाटत असावे’, असे वाटते; परंतु ६ जून २०१३ या दिवशी पुणे येथील शिंदेवाडी आणि कात्रज बोगद्याजवळ मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणार्या पाण्याने काही गाड्या वाहून गेल्या होत्या अन् त्यात मायलेकींचा अंतही झाला होता. वर्ष २०१६ मध्ये कात्रज बोगद्यात दरड कोसळली होती. त्या वेळी प्रशासनाने तात्पुरती डागडुजी केली.
पुणे शहराला टेकड्यांनी वेढलेले आहे. या टेकड्यांच्या उतारावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. तळजाई, पाचगाव पर्वती, वारजे या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. टेकड्यांच्या काही भागांचे उत्खनन केले जात असून भूमीची विक्रीही होत आहे. त्यामुळे टेकड्यांची समस्या गंभीर समस्या झाली आहे. कालांतराने, ‘एखादी दुर्घटना घडली तर तिचे दायित्व कोण घेणार ?’ असा प्रश्न आहे. डोंगर, टेकड्या यांच्या पायथ्याला अनेक इमारती उभ्या रहात आहेत. ही अतिक्रमणे आणि बांधकामे होत असतांना नैसर्गिक झरे अन् ओढे बुजवले जात आहेत. असे प्रकार कात्रज, कोंढवा, सिंहगड रस्ता, वाघोली परिसरांत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ही डोंगरफोड करतांना अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. पावसाळ्यात डोंगरावरून येणार्या पाण्यामुळे भूमीवरील माती वाहून नदीमधील गाळाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अनेक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास किती मोठे संकट येईल, याचा विचारच करू शकत नाही.
पुण्यालगतच्या टेकड्यांवर प्रामुख्याने ‘बेसॉल्ट’ दगड आहे. हा दगड कितीही कठीण असला, तरी डोंगरांची भौगोलिक रचना आणि भूस्तर यांना वारंवार धक्के पोचत राहिल्यास नैसर्गिक रचना ढासळणारच आहे. पावसाचा जोर पहाता पूणे जिल्ह्यातील सर्व डोंगर आणि टेकड्या यांचे तांत्रिक सर्वेक्षण करणे आवश्यकच आहे. प्रशासनाने जनतेच्या जिवाचा विचार करून यावर तातडीने कृती करावी, ही अपेक्षा !
– श्री. अमोल चोथे, पुणे