ईश्वरी कृपेने मिळणारे अनमोल ज्ञानधन सनातनला अर्पण करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्या ज्ञानावर आधारित सनातनच्या वतीने लवकरच प्रकाशित होणार्या ‘सुख-दुःखाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण’ या ग्रंथातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मनोगत
‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।’, अशा अभंगओळी नुसत्या कानावर पडल्या, तरी आठवण होते चंद्रभागेची, पंढरीच्या विठुरायाची आणि त्याच्या समोर नतमस्तक झालेल्या असंख्य वारकर्यांची ! ‘वारकरी संप्रदाय’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुकुटमणीच ! अशा थोर संप्रदायातीलच एक संत म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध प्रवचनकार पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे महाराज !
पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचा व्यासंग !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा रामायणासारखे ग्रंथ आणि संतचरित्रे यांचा गाढा अभ्यास आहे. महाराजांना गेल्या काही वर्षांपासून ईश्वराकडून सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञानही मिळत आहे. या दोन्ही ज्ञानांचा ते त्यांच्या प्रवचनांत वापर करतात. त्यामुळे त्यांची प्रवचने अप्रतिम होतात आणि प्रवचनांना आलेल्यांना त्यातून पुष्कळ शिकायला मिळते.
ईश्वराकडून मिळणारे अमूल्य ज्ञान सनातनला अर्पण करणारे पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज !
हिंदु संस्कृतीत विद्येला सर्वांत मोठे धन मानले आहे. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांना ईश्वराकडून मिळत असलेले अनमोल अध्यात्मज्ञान पहाता महाराज हे खर्या अर्थाने धनवान आहेत ! त्यांना मिळालेले हे ज्ञान त्यांनी २६ वह्यांत लिहिलेले आहे. व्यावहारिक जगातील ज्ञानही सहजासहजी आणि तेही विनामूल्य कुणी कुणाला देत नाही. महाराजांचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी त्यांना मिळालेले सर्व ईश्वरी ज्ञान सनातन संस्थेला अर्पण केले आहे. महाराजांच्या मनाचा हा केवढा मोठेपणा !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांना मिळणार्या ज्ञानाच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांना मिळणारे ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सदरस्वरूपात प्रकाशित करण्यात येते. त्यांच्या ज्ञानाची ग्रंथमालिकाही आम्ही संकलित करत आहोत. ‘सुख-दुःखाचे विवेचन आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांनुसार आचरण’ हा या मालिकेतील पहिला ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. महाराजांना मिळणार्या ज्ञानाची लक्षात आलेली काही वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. मी आतापर्यंत अध्यात्मावर बरेच ग्रंथ लिहिले आहेत. महाराजांना मिळणारे ज्ञान वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, मी लिहिलेले ग्रंथ हे विज्ञानाच्या रुक्ष भाषेत आहेत, तर महाराजांचे लिखाण सर्वसामान्य जनतेला कळेल, अशा प्रासादिक भाषेत आहे.
२. महाराजांचे लिखाण हे सर्वसामान्यांना ‘आपलेसे’ वाटेल अशा बोलीभाषेत आहे. त्यामुळे वाचक त्या लिखाणातील ज्ञानानुसार आचरण करण्यास लवकर उद्युक्त होईल.
३. महाराजांचे अधिकांश लिखाण हे अनेक साधकांना उपयोगी पडेल, अशा भक्तीयोगातील आहे. त्यामुळे ते भावपूर्णही आहे.
४. सर्वसामान्य लोकांना प्रतिदिन सांसारिक जीवन जगतांनाही अध्यात्माची कास कशी धरता येते, याविषयीही महाराजांनी सोपे मार्गदर्शन केले आहे, उदा. फावल्या वेळेत अनावश्यक गप्पा न मारता देवाचे नामस्मरण करा. ‘मनुष्याने त्याला लाभलेल्या अमूल्य अशा नरदेहाचे सार्थक करून घ्यावे’, ही कळकळ महाराजांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवते. नोकरी नसल्याने घरी बसून वेळ वाया घालवणार्या युवकांनाही ते संदेश देतात, ‘अरे, नुसते घरी बसू नका, तर लहानसा का होईना, काहीतरी धंदा करा अथवा देवाची उपासना करा; पण हा नरदेह सार्थकी लावा !’
५. महाराज स्वतः संत असल्याने, तसेच त्यांना मिळणारे ज्ञान हे ईश्वरी ज्ञान असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. अशा चैतन्ययुक्त ज्ञानाचा संस्कार वाचकांच्या मनावर लवकर झाल्याने ते साधनेकडे लवकर वळतात. हे लक्षात घेऊन महाराजांच्या लिखाणातील चैतन्य अल्प न होण्याकरता आम्ही त्यांच्या लिखाणाच्या भाषेत किंवा शब्दांत विशेष पालट केले नाहीत.
अत्यंत निरिच्छ वृत्तीचे पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांनी त्यांच्या ज्ञानाच्या वह्या सनातनला दिल्याच; पण त्या देऊन काही मास झाले, तरी त्यांनी ‘या ज्ञानाचे माझे ग्रंथ कधी प्रसिद्ध होतील ?’, असे एकदाही विचारले नाही. महाराजांनी त्या वह्या सनातनला दिल्या, तेव्हाच जणू त्यांनी त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित केल्या !
या ग्रंथांतील सर्व लिखाण पू. बांद्रे महाराज यांनी लिहिलेले असल्याने ग्रंथांवर ‘लेखक’ म्हणून त्यांचे नाव लिहिले आहे. मी त्यांच्या ज्ञानाचे संकलन करून ग्रंथस्वरूपात प्रसिद्ध करत असल्याने ग्रंथांवर माझे नाव ‘संकलक’ म्हणून लिहिले आहे. ‘ग्रंथांवर माझे नाव ‘संकलक’ म्हणून घालू शकतो का ?’, असे महाराजांना विचारल्यावर त्यांनी त्यासाठी आनंदाने अनुमती दिली.
अशा निरिच्छ वृत्तीच्या महाराजांकडून केवळ साधकांनाच नव्हे, तर संतांनाही बरेच काही शिकण्यासारखे आहे.
प्रार्थना !
‘पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानावर आधारित ग्रंथमालिकेचा वाचक, साधक, तसेच महाराजांचे अनुयायी आणि भक्त यांना साधनेसाठी अधिकाधिक लाभ करून घेता येऊन त्यांची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना ‘स्वतःचे ग्रंथ परात्पर गुरु डॉ. आठवले प्रसिद्ध करतील’, याची वाटणारी निश्चिती !
‘एकदा माझी पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराजांशी भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांपासून मला ईश्वरी शक्ती अध्यात्मासंबंधी सूक्ष्मातून ज्ञान द्यायची. मी मला मिळालेले ज्ञान तोडक्या-मोडक्या भाषेत लिहून काढले आहे. त्या लिखाणाची भाषा व्याकरण-अशुद्ध आहे. असे असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘आम्ही ते सर्व ज्ञान नीट संकलित करून घेऊ आणि तुमच्या नावे ग्रंथांच्या माध्यमातून प्रसिद्ध करू. तुम्ही तुमच्या सर्व वह्या मला पाठवा.’’ तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी या वह्या स्वीकारल्या नसत्या, तर हे अमूल्य ईश्वरी ज्ञान मातीमोल ठरले असते; कारण हे ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याइतकी माझी आर्थिक परिस्थितीही नाही. समाजातील लोकांना या ज्ञानाचे काहीही मोल नाही. याचे मोल केवळ परात्पर गुरु डॉक्टरांनीच जाणले.’ ‘परात्पर गुरु डॉक्टर हे सर्व ग्रंथ व्यवस्थितच पूर्ण करतील’, अशी मला निश्चिती आहे. त्यामुळे आता मी निश्चिंत झालो आहे.’’
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२४.४.२०२१)
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांची स्वतःच्या लिखाणाबद्दल नम्रता !
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांनी स्वतः लिखाण केलेल्या वह्या सनातनला दिल्या. सर्व वह्यांमधील ज्ञान संगणकात टंकलेखन आणि संकलित करून, त्यानंतर त्याचे विषयांनुसार वर्गीकरण करून एकेका विषयावर एकेक ग्रंथ काढायला पुष्कळ वेळ लागणार होता. जिज्ञासू आणि साधक या ज्ञानापासून अधिक काळ वंचित रहायला नकोत, यासाठी या ज्ञानावर आधारित लेखमाला फेब्रुवारी २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चालू करण्याचे ठरले. हे महाराजांना कळल्यावर त्यांनी पाठवलेला निरोप त्यांच्याच शब्दांत पुढे दिला आहे.
‘आपल्याला आवडणारे लेखच छापावेत. माझे शिक्षण इयत्ता चौथी आहे. लिखाणात काना-मात्रा अशा चुका झाल्या असल्यास सुधारून घ्याव्यात. माझी मराठी शुद्ध नाही, तरी मला सांभाळून घ्यावे. चुकीचे लेख छापू नयेत. ‘माझ्याशी कुठली देवता बोलते आणि मला ज्ञान देते’, हे मलाच माहीत नाही.’
– ह.भ.प. सखाराम बांद्रे, कातळवाडी, निवळी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
वारकरी संप्रदायानुसार साधना करून प्रवचनांद्वारे समाजप्रबोधन करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !
१. व्यावहारिक जीवन
१ अ. पूर्ण नाव : ‘ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे
१ आ. जन्मदिनांक : १.६.१९४७
१ इ. पत्ता : मु.पो. निवळी (कातळवाडी), तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
१ ई. शिक्षण आणि व्यवसाय : माझे शालेय शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले. मी २८ वर्षे ‘प्लास्टिक बॅग्स’चा विक्रेता म्हणून व्यवसाय केला.
२. पारमार्थिक जीवन
२ अ. महाशिवरात्रीच्या दिवशी ‘जीवनविद्या मिशन’चे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांच्याकडे जाऊन गुरुदीक्षा घेणे आणि नंतर ‘गुरु’ म्हणून दोन संत जीवनात येणे : मला वयाच्या १० व्या वर्षापासूनच अध्यात्माची आवड आहे. मी ‘वारकरी संप्रदाया’नुसार साधना करत आहे. वर्ष १९८५ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मी आणि माझी पत्नी सौ. सुनीता बांद्रे, अशा आम्ही उभयतांनी भांडुप (मुंबई) येथे ‘जीवनविद्या मिशन’चे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांच्याकडे जाऊन गुरुदीक्षा घेतली. हे माझे प्रथम गुरु होत. नंतर ‘दत्त संप्रदाया’चे प.पू. तुकाराम वनगे महाराज (पाते पिलवली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी – आध्यात्मिक कार्य नांदेड येथे) हे मला दुसरे गुरु म्हणून लाभले. त्यानंतर ‘सनातन संस्थे’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मला तिसरे गुरु म्हणून लाभले आहेत.
२ आ. स्वकष्टाने श्री विठ्ठल-रखुमाईचे एक छोटेसे मंदिर बांधणे आणि भक्तीमुळे देवाची कृपा, तसेच शक्ती, ज्ञान अन् वैराग्य प्राप्त होणे : वर्ष २००२ मध्ये आम्ही स्वकष्टाने कातळवाडीतील घरापासून काही अंतरावर श्री विठ्ठल-रखुमाईचे एक छोटेसे मंदिर बांधले. मंदिराच्या आजूबाजूला औदुंबराची १५० हून अधिक रोपे आणि पिंपळाचे रोप, असे दोन्ही ‘दैवी वृक्ष’ आपोआप उगवले. मी त्या मंदिरात पूजा-अर्चा करतो.
वर्ष २००३ मध्ये माझी पत्नी सौ. सुनीता स्वर्गवासी झाली. त्यानंतर माझ्या जगण्यातील अर्धा आनंद संपला. मी भक्ती करून आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळवल्यामुळे मला जीवनातील भयंकर दुःखांवर मात करता आली. देवाची भक्ती केल्यामुळे मला देवाची कृपा, तसेच शक्ती, ज्ञान अन् वैराग्य यांची प्राप्ती झाली. भक्तीमुळेच मला गावात कीर्तीही मिळाली.
२ इ. घराच्या अंगणामध्ये धरणीमातेची पूजा करत असलेल्या लादीवर एका स्त्रीचे जटाधारी सुंदर रूप आणि ‘ॐ’ उमटणे : माझ्या घराच्या अंगणात मी जिथे धरणीमातेची पूजा करून धूप दाखवतो, तेथील लादीवर एका स्त्रीचे जटाधारी सुंदर रूप स्पष्ट उमटले आहे. तिच्या पायाजवळ मोठा ‘ॐ’ स्पष्ट दिसत आहे.
२ ई. सुदर्शनचक्राचे दर्शन होणे : जेव्हा मी कुठल्या तरी अडचणीत सापडतो, तेव्हा मला सूक्ष्मातून सुदर्शनचक्राचे दर्शन होते. हे दर्शन मी लघुशंकेसाठी रात्री २ ते २.३० च्या दरम्यान उठतो, तेव्हा होते. आतापर्यंत मला २ – ३ वेळा असे दर्शन झाले आहे.
२ उ. ईश्वराकडून आध्यात्मिक ज्ञान मिळणे : वर्ष २००५ पासून पहाटे ४ ते सकाळी ११ या वेळेत मला ईश्वराकडून सूक्ष्मातून आध्यात्मिक ज्ञान मिळते. पुष्कळ वेळा ब्राह्ममुहूर्तावर पहाटे ४ वाजता, तसेच आणखी दिवसभरात २ – ३ वेळा ज्ञान मिळते.
मी ते ज्ञान वहीत लिहून ठेवतो. वर्ष २००५ ते २०२० या काळात मी लिहिलेल्या ज्ञानाच्या २६ वह्या ‘सनातन संस्थे’ला अर्पण केल्या आहेत. नंतर मी हे ज्ञान मिळवणे बंद करणार होतो; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सांगण्यानुसार आताही मी हे ज्ञान मिळवणे चालू ठेवले आहे.
३. ‘ईश्वराची सेवा’ म्हणून समाजप्रबोधनाचे कार्य करणे
‘वारकरी संप्रदाया’चे ह.भ.प. शांताराम महाराज कानसे यांच्याकडून मी प्रवचनाची प्रेरणा घेतली. वर्ष १९९५ पासून मी ईश्वरी सेवा म्हणून रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता, संतचरित्रे यांवर प्रवचने करून समाजप्रबोधन करत आहे.
४. पांडुरंगाच्या चरणी कृतज्ञता !
आता मी एकटाच आहे; परंतु संसारी जिवांपेक्षा आनंदात आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या जीवनात आल्याने माझा आनंद आता चार पटीने वाढला आहे. माझा एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये विवाहित आहेत. ते माझा चांगला सांभाळ करतात. माझा मुलगा, सून आणि नातू चांगले आहेत. पांडुरंगाने माझे संसाराचे तारु (नौका) तिराला चांगले लावले. यासाठी मी भगवंताप्रती कृतज्ञ आहे.’
– (पू.) ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे (डिसेंबर २०२०)
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्णिलेली महती आणि व्यक्त केलेली कृतज्ञता !
१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे विष्णूचा अवतार असल्याने त्यांना आठवा (स्मरा) आणि अंतःकरणात साठवा !
‘हिंदु धर्म हा ‘सनातन धर्म’ आहे; म्हणून परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी स्वतः चालू केलेल्या दैनिकाचे नाव ‘सनातन प्रभात’ ठेवले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या नावातील ‘जयंत’ म्हणजे ‘कुठेही पराजित होणार नाही’, तो ! परात्पर गुरु डॉक्टर जिथे पाऊल टाकतील, तिथे विजयी होतील. ते परमार्थात आले आणि विजयी झाले. त्यांनी भारत आणि परदेश येथे अनेक साधक घडवले. हे काम सोपे नाही. ते विष्णूचा अवतारच आहेत. [असा पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा भाव आहे. – संकलक] कलियुगामध्ये आता पापी लोक भरपूर झालेले आहेत. अशा वेळी देव कोणाच्याही रूपात अवतार घेतो. तेच हे अवतारी पुरुष डॉ. जयंत बाळाजी आठवले आहेत. त्यांना आठवा (स्मरा) आणि अंतःकरणात साठवा ! सर्वांनी त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे. ‘त्यांचे सतत दर्शन घ्यावे’, असे मला वाटते.
२. ‘सनातन संस्थे’सारखी दुसरी संस्था नाही !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली. ही संस्था मला सोनेच वाटत आहे. माझ्या आयुष्यात मी अशी शिस्तबद्ध संस्था दुसरी पाहिली नाही.
३. ‘मला मिळणारे ईश्वरी ज्ञान परात्पर गुरु डॉक्टरांनी जगात पोचवले’, हे त्यांचे उपकार मी या जन्मात फेडू शकणार नाही !
‘मला मिळणारे ईश्वरी ज्ञान जगाच्या मुखाला लागावे (लोकांना वाचायला मिळावे)’, अशी माझी पुष्कळ इच्छा होती. मला हे ज्ञान इतर वर्तमानपत्रांमध्ये छापण्यासाठी द्यायचे नव्हते; कारण ते पहिल्या पानावर ‘धड अंगावर वस्त्रे नाहीत’, अशी महिलांची छायाचित्रेही छापतात. त्यामुळे मी या ज्ञानाच्या वह्या त्यांना दिल्या नाहीत. मी ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात आलो नसतो आणि नारायणाने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) माझ्यावर कृपा केली नसती, तर मी रात्रंदिवस २६ वह्यांमध्ये केलेल्या लिखाणाची निवळी गावात मातीच झाली असती. [‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे नारायण आहेत’, असा पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा भाव आहे. – संकलक] तसे न होता मी लिहिलेले आध्यात्मिक ज्ञान माझ्या गुरूंच्या, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रत्येक रविवारी लेखमालेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले.
जसे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना १२ वर्षांनी उकिरड्यातून बाहेर काढून जगप्रसिद्ध केले, तसेच मला परात्पर गुरु डॉक्टरांनी जगप्रसिद्ध केले. हे त्यांचे उपकार मी या जन्मात फेडू शकणार नाही.
धन्य धन्य ते परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धन्य धन्य ते त्यांचे साधक ! ‘परमेश्वरा, यांना सुखी ठेव’, अशी मी देवाला प्रार्थना करतो. सनातनच्या सर्व साधकांना राम राम !
४. प्रार्थना
‘परमेश्वर सर्वांचे भले करो’, हीच त्या परमेश्वराकडे सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. ‘देवा, मला पुन्हा जन्माला घालायचे असेल, तर ‘सनातन संस्थे’चे कार्य करण्यासाठीच जन्माला घाल !’, अशीही देवाच्या चरणी प्रार्थना करतो.
– (पू.) ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे (७.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |