… तर सरकार हिंदूंच्या सणांच्या विरोधात असल्याचा संशय बळावेल ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मुंबई – सण-उत्सवाची परंपरा कायम राखत कोरोनाच्या परिस्थितीची योग्य ती काळजी घेऊन दहीहंडी साजरी झाली पाहिजे. ज्यांनी लसीचे २ डोस घेतले आहेत, अशा अल्प उंचीच्या दहीदंडीला सरकारने अनुमती द्यावी. असे झाले नाही, तर हे सरकार हिंदूंच्या सणांच्या विरोधात आहे, असा संशय बळावत जाईल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसमवेत २३ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली.
या वेळी प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रातील देव-दैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी का उघडली जात नाहीत ? आधी मंदिरे बंद, आता आमच्या सणावरही बंदी का ? सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदूंच्या सणांचा विसर पडला आहे.’’