प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवरील बंदीच्या आदेशाचे कठोरतेने पालन करा !
|
काणकोण, २४ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशाचे कठोरतेने पालन करण्याची मागणी येथील पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन् पिल्लई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री यांवर बंदी असतांनाही समाजातील काही घटक राज्यात अशा मूर्तींची निर्मिती किंवा विक्री करत आहेत. अशा मूर्ती शेजारील राज्यांतून विक्रीसाठी गोव्यात आणल्या जात आहेत. राज्यपाल आणि शासन यांनी यामध्ये हस्तक्षेप करून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री यांवरील बंदीचे कठोरतेने पालन करावे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचा र्हास होतो, तसेच पारंपरिक श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्याच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी राज्यातील हस्तकला महामंडळ श्री गणेशमूर्तीकारांसमवेत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधत होते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे बंद झाले आहे. यामुळे श्री गणेशमूर्तीकार आणि हस्तकला महामंडळ यांच्यामध्ये हल्ली सुसंवाद होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री यांवरील बंदीच्या आदेशाचे कठोरतेने पालन न केल्यास स्थानिक श्री गणेशमूर्तीकारांचा पारंपरिक व्यवसाय नामशेष होईल. या निवेदनाच्या प्रती शासनाचे हस्तकला महामंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निवेदनावर श्री गणेशमूर्तीकार तथा कारागीर मनोहर पागी, चंद्रकांत नाईक, रंगनाथ धुरी, अवधूत धुरी, प्रसाद बांदेकर, गुरुप्रसाद पागी, लखन पागी, रोहिदास च्यारी, संदीप च्यारी, नीरज च्यारी, आनंद च्यारी, अंबर पागी, मनोज प्रभुगावकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.