‘आयुर्वेद मंडळा’कडून कोरोनाविषयक लहान मुलांसाठी उपयुक्त असलेली मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
मडगाव, २४ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वीच विशेष करून मुलांसाठी दक्षतेचे उपाय म्हणून ‘गोवा आयुर्वेद आणि इतर तत्सम् भारतीय उपचार पद्धती मंडळ’ यांनी पालक अन् डॉक्टर यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांच्या पत्रकाचे मडगाव येथे नुकतेच एका कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा वैद्या स्नेहा भागवत, ‘रजिस्ट्रार’ वैद्य दिलीप वेर्णेकर, उपाध्यक्ष वैद्य महेश वेर्लेकर आदींची उपस्थिती होती. या वेळी वैद्या स्नेहा भागवत म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जाते. यासाठी मुलांची काळजी घेण्यासाठी मंडळाने या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात अनेक मुले कायम घरातच असल्याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांशी संवाद कसा साधावा ? त्यांचा आहार कसा असावा ? मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधे घेता येतील ? दैनंदिन आहार कोणता असावा ? कोरोना महामारीच्या काळात पालकांनी कोणते नियम पाळावेत ? मुलांची देखभाल कशी करावी ? कोरोनाची लक्षणे दिसल्यास काय करावे ? आदींविषयी माहिती आहे.’’ सुवर्णप्राशन हे लहान मुलांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे वैद्या स्नेहा भागवत पुढे म्हणाल्या. या वेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.