शिवोली येथे रशियाच्या महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे कारण अजूनही गुप्त !

चेन्नई येथील एका छायाचित्रकाराने रशियाच्या महिलेला केले होते ‘ब्लॅकमेल’

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी, २४ ऑगस्ट (वार्ता.) – ओशेल, शिवोली येथे २० ऑगस्ट या दिवशी रशियाच्या २ महिलांचा मृत्यू झाला होता. यामधील एक महिला अलेक्झेंड्रा ही एक उत्तम अभिनेत्री होती आणि तिने तमीळ चित्रपटातही काम केले होते, तसेच ती ‘मॉडेल’ म्हणूनही प्रसिद्ध होती. अलेक्झेंड्रा हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

अलेक्झेंड्रा ही मृत्यूपूर्वी अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती आणि तिच्या वागणुकीतही पालट झाला होता, असे तिच्या मित्रांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले आहे. चेन्नई येथील एका छायाचित्रकाराने शारीरिक छळ केल्यामुळे अलेक्झेंड्रा यांनी तेथील पोलिसांत संबंधित छायाचित्रकाराच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती आणि या तक्रारीनंतर छायाचित्रकाराला पोलिसांनी कह्यात घेतले होते. आपली मागणी पूर्ण न केल्यास काही अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार असल्याची धमकी या छायाचित्रकाराने अलेक्झेंड्रा यांना दिली होती. अलेक्झेंड्रा यांच्या तक्रारीनंतर सामाजिक माध्यमांत ‘मी-टू मूव्हमेंट’ राबवण्यात आली होती. अलेक्झेंड्रा यांच्या मृत्यूवरून गोव्याच्या सुरक्षेविषयी अनेक जण सामाजिक माध्यमांत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.