तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांची अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीला भेट
उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचा सन्मान
तपोभूमी कुंडई (प्रसिद्धीपत्रक) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे कार्य चालू आहे. या ठिकाणी कुंडई, गोवा येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पिठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी नुकतीच भेट दिली.
सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी हिंदु धर्म आचार्य सभा, अखिल भारतीय संत सभा, दिव्य देवस्थान सभा अशा विविध भव्यदिव्य कार्यक्रमांतून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी विशेष नेतृत्व केले आहे. १९ ऑगस्टला हिंदु धर्म आचार्य सभेच्या प्रमुख सदस्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांची लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी श्रीराम मंदिर उभारणी आणि हिंदु धर्म अन् संस्कृती यांविषयी चर्चा केली. या वेळी सर्व आचार्यांनी मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांच्या धाडसी आणि दूरदर्शी उपक्रमांसाठी त्यांचे अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले, तसेच उत्तरप्रदेश सरकारच्या यशस्वी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथजी यांनी गोव्यात सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या विविध क्षेत्रांतील कार्याची नोंद घेतली. या वेळी उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर हिंदु धर्म आचार्य सभेतील सर्व संत-महंतांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या ठिकाणी श्रीरामलल्लांचे दर्शन घेऊन मंदिर उभारणीच्या कार्याची पहाणी केली.
या वेळी हिंदु धर्म आचार्य सभेचे संयोजक स्वामी परमात्मानंद सरस्वती (राजकोट), सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी (गोवा), महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद स्वामीजी (मुंबई), स्वामी ज्ञानानंदजी (वृंदावन), शास्त्री माधवप्रियदासजी (गुजरात), स्वामी कृष्णमणिजी (गुजरात), श्री शंभूनाथजी, श्री योगराजजी आदी संत-महंत उपस्थित होते.