श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती
१. रामनाथी आश्रमातून नागेशी येथे गेल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची पुष्कळ आठवण येणे
‘१९.५.२०२१ या दिवशी मी नागेशी येथे गेले होते. तेथे पू. परांजपेआजोबा (सांगली येथील सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे) नामजप करत असतांना त्यांच्या समवेत मी नामजपाला बसले होते. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची पुष्कळ आठवण येत होती. रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागल्यापासून मी रामनाथी आश्रम सोडून अधिक दिवस कुठे राहिले नव्हते. रामनाथी आश्रमात असतांना मी दिवसातून एकदा तरी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सेवा करत असलेल्या खोलीत डोकावून जात असे. एखाद्या दिवशी त्या दिसल्या नाहीत, तर मला चुकल्यासारखे वाटत असे.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात जाणे आणि त्यांच्या चरणांशी बसून आत्मनिवेदन करणे
त्यांच्या आठवणीने माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रू वहात होते. ‘आपण फुलपाखरू बनूया आणि रामनाथीला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना भेटायला जाऊया’, असे मला वाटत होते; परंतु मला फुलपाखरू किंवा चिमणी बनता येत नव्हते. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘आपण सूक्ष्मातून त्यांच्याकडे जाऊया.’ नंतर मी सूक्ष्मातून त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या चरणांशी बसून आत्मनिवेदन केले, ‘मला पुन्हा रामनाथीहून कधीही कुठे पाठवू नका. हे वियोगाचे दुःख फार असह्य आहे. मला ठाऊक आहे की, ही माझी स्वेच्छा आहे; परंतु मला सहन होत नाही. आई मुलाला रागावते, तरी त्यात तिचा वात्सल्यभाव असतो. तुम्ही तर सगळ्या जगताची आई आहात. माझ्यात पुष्कळ स्वभावदोष आहेत. त्यामुळे मी तुमच्या चरणांशी येऊ शकत नाही; परंतु हे स्वभावदोष आणि अहं दूर करून तुम्हीच मला स्वच्छ आणि पवित्र बनवा अन् तुमच्या चरणांशी येण्यास पात्र बनवा.’
३. साधिका सूक्ष्मातून लहान मुलीप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांशी बसणे, त्यांनी साधिकेला उचलून मांडीवर घेणे, साधिकेचा भाव जागृत होणे आणि ती ज्योतीच्या रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात विलीन होणे
थोड्या वेळाने प.पू. गुरुदेव भगवान श्रीविष्णूच्या रूपात शेषशय्येवर पहुडलेले दिसले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई लक्ष्मीच्या रूपात त्यांच्या चरणांशी बसलेल्या दिसल्या. मी लहान मुलीप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांशी बसले होते. प.पू. गुरुदेव श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना म्हणाले, ‘ही बघा, इथे काय करते ?’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी मला उचलून मांडीवर घेतले. तेव्हा माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबले. त्या वेळी माझे मन सुखावल्यासारखे वाटत होते. मला पुष्कळ शांत वाटत होते. मला एक वेगळीच स्थिती अनुभवता येत होती. नंतर मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या मांडीवरून उतरून पुन्हा त्यांच्या चरणांजवळ बसले आणि त्यांना म्हटले, ‘या चरणांविना मला दुसरे काही नको.’ तेव्हा थोड्या वेळाने माझ्या देहाचे रूपांतर एका ज्योतीमध्ये झाले. ती ज्योत त्यांच्या चरणांशी तेवत होती. नंतर थोड्या वेळाने ती ज्योत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात विलीन झाली.
पू. परांजपेआजोबा यांच्यासमवेतचा नामजप संपल्यावर ‘कृतज्ञता व्यक्त करूया’, असे म्हटल्यावर मला स्वतःचे अस्तित्व जाणवले. दिवसभर मला एक वेगळीच स्थिती अनुभवता येत होती. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या कृपेने मला हे अनमोल क्षण अनुभवता आले’, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता अर्पण करते.’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०२१)
|