मराठवाडा विद्यापिठातील ११ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी कायमस्वरूपी बंद !
संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठांतर्गत चालवण्यात येणारे विविध ११ अभ्यासक्रम केवळ विद्यार्थी मिळत नाहीत किंवा विद्यार्थी अल्प अन् प्राध्यापक अधिक असल्याच्या परिस्थितीमुळे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय २३ ऑगस्ट या दिवशी घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी विद्यापिठाचा ६३ वा वर्धापनदिन होता आणि याचदिवशी हा निर्णय घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाविषयी काही शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी खासगी विद्यापीठ किंवा खासगी मोठ्या शैक्षणिक संस्था यांचे हित विद्यापिठाने पाहिले का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे, तसेच विद्यापिठाने ‘नॅक प्लस’ क्रमांक मिळवतांना याच अभ्यासक्रमाला ‘नॅक’च्या समितीपुढे ठेवले होते, याची आठवण करून दिली.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली. विद्यापिठातील विभागांतर्गत चालवण्यात येणार्या काही अभ्यासक्रमास अल्प प्रतिसाद असल्याचे सूत्र चर्चेत आले. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या ५ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अल्प प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. राजेश करपे यांनी दुजोरा दिला आहे. ‘विद्यार्थ्यांअभावी अभ्यासक्रम चालवणे म्हणजे पांढरा हत्ती सांभाळण्यासारखी परिस्थिती समोर मांडण्यात आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला आहे’, असे त्यांनी सांगितले.