केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

डावीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संगमेश्‍वर (जिल्हा रत्नागिरी) – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राणे यांच्यावर नाशिक, पुणे, महाड (जिल्हा रायगड), जळगाव आदी ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक येथून पोलीस पथक संगमेश्‍वर येथे आले होते. दरम्यान राणे यांनी ‘अटकपूर्व जामीन मिळावा’, यासाठी प्रयत्न केले; मात्र रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही तातडीने सुनावणी करण्यास नकार देत त्यांना जामीन नाकारला. शेवटी रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करत राणे यांना कह्यात घेतले. अटकेच्या वेळी राणे यांच्या समवेत मुलगा नीतेश राणे, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांसह अन्य नेते उपस्थित होते. राणे यांना एक रात्र पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे. जामीन अर्जावर २५ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ २४ ऑगस्ट या दिवशी रत्नागिरीत होणार होती. हीच यात्रा घेऊन ते गोळवली (संगमेश्‍वर) येथे आले होते. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे स्वत: संगमेश्‍वर येथे पोचले. त्यांनी राणे यांना गुन्ह्याची सर्व माहिती दिली. ‘सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून राणे यांना रायगड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे’, असे पोलीस अधीक्षकांनी या वेळी सांगितले.

या अटकेच्या विरोधात येथील भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना हटवले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी संगमेश्‍वर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.

संभाजीनगर येथे शिवसेनेकडून आंदोलन !

संभाजीनगर येथील क्रांतीचौक येथे नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांसमवेत हातात कोंबड्या घेऊन घोषणा देत राणे यांचा निषेध केला. दानवे यांनी राणे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही ! – नारायण राणे

२४ ऑगस्ट या दिवशी माध्यमांशी बोलतांना नारायण राणे म्हणाले, ‘‘माझ्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. मी काय साधा माणूस वाटलो का ? मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही (पत्रकारांनी) पडताळून पहा.’’

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट या दिवशी महाड येथे ‘जनआशीर्वाद यात्रे’च्या वेळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर टीका करतांना राणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांना कोण उपदेश देतो, हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय उपदेश देणार ? ते काय डॉक्टर आहेत ? तिसर्‍या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला ? अपशकुनासारखे बोलू नये. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का ? बाजूला एखादा ‘सेक्रेटरी’ (सचिव) ठेव आणि बोल म्हणावे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली ? अरे हीरक महोत्सव म्हणजे काय ? मी असतो, तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी ?’’ (मुख्यमंत्र्यांनी ‘अमृत महोत्सवा’ऐवजी ‘हीरक महोत्सव’ असे म्हटले होते.)

जुहू (मुंबई) येथे नारायण राणे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !

मुंबई – नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर शिवसेनाप्रणीत ‘युवासेने’च्या वतीने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कार्यकर्त्यांनी राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी राणे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते शिवसैनिकांशी भिडले. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना रोखलेे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

दादर येथे राणे यांच्या विरोधात फलक लावले !

दादर येथील ‘खोदादाद सर्कल’ येथे नारायण राणे यांच्या विरोधात राणे ‘कोंबडी चोर’, असे त्यांना हिणवणारा फलक लावण्यात आला होता. या फलकावर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांच्या नावाचा उल्लेख होता. हे फलक लावल्यानंतर थोड्या वेळातच पोलिसांनी हे फलक उतरवले.

नाशिक येथे शिवसैनिकांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेक !

नाशिक – येथे शिवसैनिकांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात विविध ठिकाणी ३ गुन्हे नोंदवण्यात आले. यामुळे येथील शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नाशिक येथील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. भाजपच्या विरोधात शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. या वेळी राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

पश्‍चिम महाराष्ट्रातील घडामोडी…

पुणे  

१. पुणे शहरातील नारायण राणे यांच्या मालकीच्या ‘आर्. डेक्कन मॉल’वर शिवसैनिकांनी दगडफेक केली.

२. पुणे येथील भाजप कार्यालयात कोंबड्या सोडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे यांचा निषेध केला. भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगली

१. सांगली शहरात भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर राणे यांच्या फलकावर शाई फेकण्यात आली. भाजपच्या वतीने घटनास्थळी या कृत्याचा निषेध करून राणे यांच्या चित्रावर दूध घालण्यात आले. शाई फेकणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

२. सांगली शहर शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी पोलिसांनी शिवसैनिकांकडून हा पुतळा काढून घेतला. या प्रसंगी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात झटापट झाली. शिवसेनेच्या महिला आघाडीने हातात कोंबड्या घेऊन आणि कोंबड्यांना बांगड्यांचा अहेर देऊन राणे यांचा निषेध केला.

कोल्हापूर  

१. ‘नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. केंद्रीय मंत्रीपद देऊन भाजपने केलेले उपकार फेडण्यासाठीच राणे यांच्या उचापती चालू आहेत. केंद्रीय मंत्रीपदाच्या नशेत असणार्‍या राणे यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे’, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

२. शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

अमरावती येथे शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयावर आक्रमण आणि जाळपोळ !

अमरावती – शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर आक्रमण करून कार्यालयाबाहेर जाळपोळ केली. या वेळी राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. युवासेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुढदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राजापेठ परिसरातील भाजप कार्यालयावरही आक्रमण केले. कार्यालयावर असणार्‍या पक्षाच्या नावावर काळी शाई फेकण्यात आली, तसेच कार्यालयाबाहेर असणारे फलक जाळण्यात आले. दगड आणि काठ्या यांनी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. पोलीस पथकाने आक्रमण करणार्‍यांचा शोध घेणे चालू केले आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

जळगाव येथेही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंद !

जळगाव – जळगाव येथे सकाळी शिवसेनेच्या वतीने आंदोलन आणि घोषणा देण्यात आल्या. शहर पोलीस निरीक्षक विलास शेंडे आणि जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या वेळी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांच्यासमवेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री. गुलाब वाघ, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसैनिक गजानन मालपुरे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विक्रम (गणेश) सोनवणे, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ. शोभा चौधरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महानगर शिवसेनेच्या वतीने राणे यांची प्रतिमा डुकरांना बांधून भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी कोंबड्या फेकल्या. कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीस कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

नारायण राणे यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्यांविषयी असे वक्तव्य कधीही करण्यात आले नाही. राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वाद चिघळू न देता राणे यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी, असे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्य सरकार एवढी तत्परता शरजील उस्मानी याला अटक करण्यासाठी का दाखवत नाही ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणच्या पोलिसांचे पथक धाडले जात आहे. राज्य सरकार एवढीच तत्परता शरजील उस्मानी प्रकरणामध्ये का दाखवत नाही ? असा प्रश्‍न विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राणे यांच्या अटकेनंतर २४ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही; मात्र मंत्री आणि व्यक्ती म्हणून भाजप नारायण राणे यांच्या मागे उभी आहे. सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलीस राज्य सरकारच्या दबावात येऊन काम करत आहे. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे अदखलपात्र गुन्हा असून त्यासंबंधी चौकशी करायची असेल, तर आधी नोटीस द्यायला हवी; मात्र राजकीय दबावापोटी या गुन्ह्याची दखलपात्र गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक पाठवले जात आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणांत न्यायालयाकडून चपराक मिळूनही राज्य सरकार काहीही शिकलेले दिसत नाही.’’

… अन्यथा पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करू !

नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. शिवसैनिकांकडून केला जाणारा हा प्रकार सहन केला जाणार नाही. या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले जाईल. भाजपच्या कार्यालयांवर आक्रमण करणार्‍यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. आक्रमणकर्त्यांवर कारवाई झाली नाही, तर त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयासमोर मी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आंदोलन करू, अशी चेतावणी फडणवीस यांनी दिली.

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही !

नारायण राणे यांना काही कारणास्तव थांबावे लागले, तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार हे ही यात्रा पूर्ण करतील, असे या वेळी फडणवीस यांनी म्हटले.