पुणे येथील पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा !
पुणे, २१ ऑगस्ट – चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी येथील पोलीस आयुक्तालयासमोर आत्महत्या करणार्या सुरेश पिंगळे यांच्या पिशवीत २ पत्रे सापडली होती. त्यापैकी एका पत्रामध्ये ते ६ मासांपासून कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली होते, असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्ट या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. उपचार चालू असतांनाच १९ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी त्यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रात्री ११ वाजता मृतदेह कह्यात घेतला. त्यानंतर २० ऑगस्ट या दिवशी पहाटे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.