वणी खुर्द (चंद्रपूर) गावात २ कुटुंबांतील ७ जणांना दोरीने बांधून मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
वृद्धांसह ५ जण गंभीर घायाळ !
चंद्रपूर – येथील तेलंगाणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात २१ ऑगस्ट या दिवशी जादूटोणा केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी कांबळे आणि हुके या २ कुटुंबांतील ७ लोकांना दोरीने बांधून भर चौकात बेदम मारहाण केली आहे. यामध्ये ४ महिला आणि ३ वृद्ध यांचा समावेश आहे. वृद्धांसह ५ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी १३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कडक चौकशी केल्यानंतरच गावात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.
यामध्ये शांताबाई कांबळे, शिवराज कांबळे, साहेबराव हुके, धम्मशीला हुके, पंचफुला हुके, प्रयागबाई हुके आणि एकनाथ हुके, अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. ७ जणांना मारहाण करतेवेळी दोन्ही कुटुंब स्वत:ला सोडण्याची विनंती करत होते; मात्र कुणीही त्यांच्या साहाय्यासाठी पुढे गेले नाही. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले की, वणी खुर्द गावात घडलेल्या घटनेनंतर शांतता आणि सुव्यवस्थेविषयी गावाचे सरपंच आणि पोलीस यांची बैठक झाली. सध्या सर्व आरोपी पसार असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी गावाला भेट देतील. काही जणांकडून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी प्रत्यक्षात तसे चित्र नाही. या घटनेत जादूटोण्याचा प्रकार असण्याची शक्यता आहे; मात्र जातीभेद किंवा तसा काहीही प्रकार दिसून आलेला नाही.
मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून कारवाईचे आश्वासन !
या घटनेविषयी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा असे धैर्य होऊ नये, यासाठी निश्चितच आमच्याकडून प्रयत्न केले जातील. पुढील अधिवेशनात अशा विषयावर सविस्तर चर्चा करू.