मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणार्या शेतकर्याचा उपचार चालू असतांना मृत्यू !
मानसिक ताण सहन न झाल्याने होणार्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण पहाता आत्महत्या टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना ! – संपादक
मुंबई – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी मंत्रालयाच्या बाहेर २० ऑगस्ट या दिवशी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा २२ ऑगस्टच्या रात्री उपचार चालू असतांना मृत्यू झाला. सध्या सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश जाधव यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तो मंचर पोलीस ठाण्यात हस्तांतरीत केला आहे.
सुभाष जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सावकाराकडून ५ लाख रुपये ५ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते; मात्र पैसे परत न केल्यामुळे सावकाराने जाधव यांच्या घराची तोडफोड करून मारहाण केली होती. याविषयी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे २० ऑगस्ट या दिवशी त्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नव्हता.
काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकर्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी जळगाव येथील एका शेतकर्यानेही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी त्याला रोखले होते.