ध्यानाच्या वेळेत नामजप करतांना भावजागृतीचे प्रयत्न करून विष्णुलोक, गणेशलोक आणि दुर्गालोक येथे गेल्यावर साधिकेने अनुभवलेले आनंददायी भावविश्व !
‘३०.६.२०२० या दिवशी ९.३० ते १० या वेळेत नामजप करतांना मी भावजागृतीचे प्रयत्न केले.
१. विष्णुलोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग
१ अ. ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करतांना विष्णुलोकात जाण्याचे ठरवणे, त्या वेळी स्वभावदोषांच्या डोंगराचा अडथळा येऊन ‘डोंगराच्या शिखरावर विष्णुरूपात परात्पर गुरु डॉक्टर उभे असून ते वर येण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत’, असे दिसणे : ‘मी आरंभी ‘श्री विष्णवे नमः ।’ असा नामजप केला. हा नामजप करतांना ‘मला विष्णुलोकात जायचे आहे’, असा भाव मी ठेवला. ‘विष्णुलोकात कसे जावे ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्या वेळी मला ‘भला मोठा डोंगर अडथळा बनून उभा आहे’, असे दिसले. ‘एवढा मोठा डोंगर कसा पार करावा ?’, असा मला प्रश्न पडला. ‘हा डोंगर, म्हणजेच माझ्यातील स्वभावदोष आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘डोंगराच्या शिखरावर विष्णुरूपात परात्पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत आणि ते माझ्याकडे पाहून मला वर येण्यासाठी खुणावून प्रोत्साहन देत आहेत’, असे मला दिसले. त्यांनी माझ्यासाठी ‘शरणागती, कृतज्ञता आणि भावजागृती यांचे दोर खाली सोडले असून त्यांना धरून वर येण्यासाठी ते मला वारंवार सुचवत आहेत’, असे मला जाणवले. ‘मी त्या दोरांच्या साहाय्याने चढून वर जात आहे आणि देव मला साहाय्य करत आहे’, असे मला जाणवले.
१ आ. विष्णुलोकातील आनंददायी वातावरण पाहून मन हरखून जाणे आणि तेथे उच्च कोटीच्या आनंदाची अनुभूती येणे : विष्णुलोकात पोचल्यावर तेथील आनंददायी वातावरण पाहून मी हरखून गेले. माझ्या मनातील सर्व विचार नष्ट झाले. मला हलकेपणा जाणवून काही क्षणांतच तिथे मला उच्च कोटीच्या आनंदाच्या अनुभूती येऊ लागल्या. ‘अन्य साधक, संत आणि सद्गुरु हेही माझ्या समवेत असून त्या आनंदात डुंबत आहेत’, असे मला दिसले. मी श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींना विचारले, ‘या वैकुंठलोकात मला एक खोली मिळू शकेल का ?’ ते म्हणाले, ‘एक खोली काय, तुला राजवाडाच देतो !’’ त्यांनी असे सांगितल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ इ. विष्णुलोकात ‘गुरुमाऊली आणि आनंद’ एवढेच अनुभवणे अन् ‘देह म्हणजे एक चैतन्याचा गोळा आहे’, असे जाणवणे : आम्ही सर्व साधक वैकुंठाच्या द्वाराशी येऊन पोचलो. तेथे तुळशीचे तोरण लावले होते आणि विष्णुतत्त्वाची रांगोळी काढलेली होती. ते पाहून माझा मनातून ‘श्री विष्णवे नमः ।’हा नामजप चालू झाला. मला आनंद होऊन माझे मन भरून आले. माझी सतत भावजागृती होत होती. तेथे मला जाणवले, ‘कुणी कुणाची आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा किंवा मुलगी नाही. त्या ठिकाणी केवळ ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊली अन् आनंद’ एवढेच प्रत्येक जण अनुभवत आहे. त्या ठिकाणी ‘सर्व साधकांचा देह, म्हणजे एक चैतन्याचा गोळा आहे’, असे मला जाणवले.
१ ई. वैकुंठात स्नान करून आरती करण्याचा विचार येणे, तेव्हा गुरुमाऊलींनी येथील वातावरण अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ असल्याने स्नान करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे : ‘आता वैकुंठातच आपल्या सर्वांना रहायचे आहे. आपण प्रतिदिन सकाळी ६ वाजता सभागृहात ध्यानाला बसत जाऊ. यासह प्रतिदिन पहाटे काकड आरतीही करू’, असे मी सहसाधकांना सुचवते; पण तेवढ्यात मनात आले, ‘४ वाजता काकड आरती करायची, म्हणजे स्नान झाले पाहिजे.’ तेव्हा माझ्या अंतर्मनातील विचार जाणून श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींनी सुचवले, ‘इथे तर सर्व चैतन्य आहे. वायुदेवता येथे स्वच्छता करतात. वरुणदेवता सर्व ठिकाणची शुद्धी करतात. त्यामुळे वेगळे काही करायची आवश्यकता नाही.’ येथे सर्वत्र चैतन्य असल्याने कुणावरच आवरण येत नाही. येथील फुलेही सदा बहरलेली असतात आणि तुळशीची रोपेही कायम आनंदाने डोलत असतात.
१ उ. तोंडवळ्यावरील पावडर म्हणून साधिकांनी गुरुमाऊलींच्या चरणांवरील धूलीकण लावणे, कुंकू म्हणून श्री लक्ष्मीमातेच्या चरणांजवळील कुंकू लावणे आणि गुणरूपी अलंकार घालणे: विष्णुलोकातील वातावरण अनुभवतांना मला प्रश्न पडला, ‘साधिकांना त्यांच्या तोंडवळ्याला पावडर लावायची असेल, तर त्या काय करतील ? तेवढ्यात मला ‘काही साधिका श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या पावलांना हळूवारपणे आपल्या हातावर घेऊन त्यांच्या तळपायांना लागलेले कण तोंडवळ्याला लावत आहेत’, असे दिसले. त्यामुळे त्या अधिकच सुंदर दिसत आहेत. ‘त्या साक्षात् श्री लक्ष्मीमातेच्या चरणांजवळील कुंकवाच्या राशीतून कुंकू लावत आहेत आणि तोंडवळ्याची सात्त्विकता आणखी खुलवत आहेत’, असे पहायला मिळाले. ज्या साधिकेला अलंकार घालायची इच्छा होते, त्यांच्याकडे लक्ष्मीमाता पहाते आणि पाहिल्याक्षणी त्या साधिकेला तिच्या अंगावर अलंकार आल्याचे जाणवू लागते. या ठिकाणी अलंकार म्हणजे ‘सर्व गुण आहेत’, असे मला जाणवले.
१ ऊ. विष्णुलोकात सर्व जण आनंदी स्थितीत आहेत. कुणीही वृद्ध किंवा दुःखी नाही. सर्वांच्या तोंडवळ्यावर लहान बालकाप्रमाणे आनंद दिसत होता. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. ‘वैकुंठलोकातील जीवन कसे असेल ?’, याविषयीची अनुभूती या भावप्रयोगातून साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींनी दिल्याने मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. मला ‘कृतज्ञता’ हा शब्दही अपूर्ण वाटला !
२. गणेशलोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग
२ अ. गणेशलोकात जाण्याचा विचार येणे आणि नामजप करत मूलाधारचक्राकडे पाहिल्यावर चैतन्याची लहर येऊन गणेशलोकात पोचणे: ‘विष्णुलोकातून निघून आता गणेशलोकात जायचे आहे’, असे वाटल्याने मी ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप चालू केला. ‘गणेशलोक कसा असेल ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी ‘मूलाधारचक्राकडे बघ’, असे कुणीतरी मला सांगितले. मी तसे केल्यावर माझ्या मूलाधारचक्रातून ‘चैतन्याची एक लहर मेंदूकडे जात आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवले. नंतर मी गणेशलोकात पोचले.
२ आ. गणेशलोकात सर्वत्र लाल रंग, गणेशतत्त्वाची रांगोळी आणि गळ्यात लाल फुले अन् दुर्वा यांचे हार घातलेला विराट श्री गणेश दिसणे : गणेशलोकाच्या प्रवेशद्वारावर मला लाल फुलांचे तोरण लावलेले आणि गणेशतत्त्वाची रांगोळी काढलेली दिसली. मी आत प्रवेश केल्यावर मला श्री गणेशाचे अतिशय विराट रूपात दर्शन झाले. तिथे सर्वत्र लाल रंग दिसत होता. मला श्री गणेश दुर्वांच्या हिरव्यागार गालिच्यावर फिरतांना दिसला. त्याच्या गळ्यात लाल फुले आणि दुर्वा यांचे सुंदर हार दिसले.
२ इ. गणेशाला मनातील सर्व विकल्प नष्ट करण्यासाठी प्रार्थना करणे आणि त्याच्या चरणी अहंकार, विकल्प, द्वेष आणि मत्सर असणारी बुद्धी अर्पण करणे : ‘आज मला श्री गणेशाला माझ्या बुद्धीचा आढावा द्यायचा आहे. ‘मला कोणते विकल्प येतात ?’, हे अपराधीपणाने श्री गणेशाच्या समोर जाऊन मांडायचे आहे’, असे माझ्या मनात वारंवार आले; परंतु मला माझीच लाज वाटत राहिली. माझ्या मनात ‘हे गणेशा, तू बुद्धी दिलीस. ती बुद्धी मी ‘अहंकारी विचार, कल्पनाविलास आणि अयोग्य विचार’ करण्यासाठी वापरली. मी कधी कधी ती राग, द्वेष आणि मत्सर करण्यासाठी वापरली. मी या बुद्धीचा धर्मप्रचार आणि गुरुकार्य करणे, यांसाठी अल्प वापर केला’, असे विचार मनात येऊन मला रडू आले. मी लगेचच श्री गणपतीच्या पुढे अक्षरशः लोटांगण घातले. ‘श्री सिद्धिविनायका, माझ्या मनातील सर्व विकल्प नष्ट कर. ‘या बुद्धीचे काय करायचे ?’, हे तूच सांग’, अशी मी आर्ततेने प्रार्थना केली. मी श्री गणेशापुढे संपूर्ण शरणागत झाले. तेव्हा श्री गणेशाने मला सांगितले, ‘साधनेत अडथळा आणणारी ही बुद्धी तू माझ्या चरणी अर्पण कर.’ मी माझे अहंकार, विकल्प, द्वेष आणि मत्सर यांनी युक्त बुद्धी एका डबीत भरली आणि श्री गणेशाच्या चरणी ठेवून दिली.
२ ई. ‘मनात केवळ गुरूंच्या आज्ञापालनाचे विचार येऊन त्याद्वारे गुरुकार्याचा प्रसार होऊ दे’, अशी आर्ततेने प्रार्थना करून श्री गणेशाचा आशीर्वाद घेणे : ‘यापुढे माझ्या मनात केवळ गुरूंच्या आज्ञापालनाचे विचार राहून त्याद्वारे गुरुकार्याचा प्रसार होऊ दे’, अशी मी आर्ततेने प्रार्थना केली. त्यावर श्री गणेशाने ‘तथास्तु’ म्हटले. नंतर मला हलकेपणा जाणवून आनंदी वाटू लागले. माझी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ म्हणत मी सिद्धिविनायकाच्या चरणी दूर्वा अर्पण केल्या.
३. दुर्गालोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग
३ अ. दुर्गालोकात गेल्यावर कुलस्वामिनी भवानीदेवीचे दर्शन होऊन भावजागृती होणे : गणेशलोकातून निघून मी ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप करत दुर्गालोकात पोचले. मला त्या ठिकाणी शिवासहित श्री भवानीदेवीचे दर्शन झाले. एखादे हरवलेले बालक त्याच्या आईला भेटल्यावर जसे गहिवरते, तसा श्री भवानीमातेला बघून माझा भाव दाटून आला. मला तिच्यामध्ये माझी कुलस्वामिनी दिसू लागली.
३ आ. दुर्गालोकातील सर्व साधिकांनी भवानीमातेला आळवणे, तिच्या शस्त्रांतून फुले पडणे आणि ती कुलस्वामिनीच्या नामाचा प्रसार करवून घेणार असल्याचे जाणवणे : दुर्गालोकात मला सर्व साधिका दिसल्या. आम्ही सर्व जणींनी श्री भवानीमातेला आळवले, ‘हे माते, आम्ही तुला संपूर्णपणे शरण आलो आहोत. तूच आम्हाला पदरात घे.’ त्यानंतर देवीच्या हातांतील शस्त्रांमधून फुले पडू लागली. ‘ती सर्व फुले साधिकांच्या ओंजळीत येत आहेत’, असे मला जाणवले. ‘हात केवळ आपले आहेत आणि त्यातील शक्ती मात्र भगवतीची आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘मला केवळ कर्म करायचे आहे, म्हणजे कुलस्वामिनीच्या नामजपाचा प्रसार करायचा आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘देवी हा प्रसार माझ्याकडून करवून घेणार’, असेही मला वाटले.
३ इ. साधिकांनी देवीची ओटी भरणे आणि अलंकार अर्पण करून हार घालणे : ‘भवानीदेवीची ओटी भरूया’, असे विचार माझ्या मनात आले. मी माझ्या हातात लाल रंगाची नऊवारी साडी, श्रीफळ, मंगळसूत्र, जोडवी, मोगर्याचा गजरा आणि अत्तर घेतले. माझे हात देवीमातेच्या विशाल रूपाच्या मानाने इवलेसे दिसत होते. मी देवीप्रती भाव ठेवून ओटी अर्पण केली. आम्ही सर्व जणी मिळून भवानीमातेची ओटी भरत होतो. आम्ही देवीला भावपूर्णरित्या साडी नेसवून सर्व अलंकारही अर्पण केले आणि हार घातला.
३ ई. ‘सर्व साधिका आणि संत भवानीमातेचा जयघोष करून देवी समवेत चालू लागणे, देवी अनिष्ट शक्तींचा विनाश करत आहे’, असे दृश्य दिसणे आणि हिंदु राष्ट्राचे कार्य सिद्धीस जाणार असल्याचे जाणवणे : आम्ही सर्व साधिका भवानीमातेचा जयघोष करून देवीच्या समवेत चालू लागलो आहोत. सर्वांत पुढे श्री भवानीमाता, तिचा पदर धरून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यामागे सर्व संत, साधिका अन् सर्व जण निघाले आहेत. देवी अनिष्ट शक्तींचा विनाश करत आहे’, असे दृश्य मला दिसले. त्याच वेळी ‘श्रीविष्णुरूपातील गुरुदेव आणि शिवतत्त्व बीजरूपाने सर्वांना शक्ती देत आहेत. कार्याचे बीज पेरत आहेत आणि त्याला फलद्रूप करण्याचे काम श्री भवानीमाता करत आहे. ऋद्धि-सिद्धि याही कार्यरत झाल्या आहेत आणि म्हणूनच हिंदु राष्ट्राचे कार्य सिद्धीस जाणार आहे’, असे मला भावप्रयोगात अनुभवता आले.
या वेळी ‘सर्वांचा भावपूर्ण नामजप होऊन तो श्री भवानीमातेच्या चरणी अर्पण होत आहे’, असे मला जाणवले. गुरुदेवांनी आज माझ्यावर कृपेची उधळण केली आणि ते मला या भावविश्वात घेऊन गेले. त्याबद्दल माझी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.
४. देवतांचे उच्च लोक अनुभवतांना झालेली मनाची विचारप्रक्रिया
अ. ‘येणार्या आपत्काळात ‘श्री विष्णवे नमः।’ या जपाने सर्व साधकांभोवती श्रीविष्णूचे, म्हणजे नारायणाचे अभेद्य असे संरक्षककवच निर्माण होणार आहे.
आ. ‘श्री सिद्धिविनायकाय नमः।’ या मंत्रजपाने साधकांना सिद्धिविनायकाची शक्ती मिळून त्यांच्या बुद्धीचा लय होऊन ती सात्त्विक होणार आहे. हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक अशा ऋद्धि-सिद्धिची शक्तीही मिळणार आहे. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व विघ्ने सिद्धिविनायकाच्या नामजपाने दूर होणार आहेत’, असे मला जाणवले.
इ. ‘श्री भवानी देव्यै नमः ।’ या नामजपाने सर्व साधकांवर कुलस्वामिनीची कृपा होऊन त्यांच्यात नामाची शक्ती आल्याने येणार्या आपत्काळात त्यांना लढता येईल आणि ‘शेवटी साधकांचाच विजय होणार, म्हणजेच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘या सर्व कार्यात विष्णुरूपातील गुरुदेव बीजरूपाने कार्य करणार आहेत आणि सर्व साधक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार सेवा करणार आहेत’, असे जाणवले.
हे गुरुदेवा, ‘जणू काही हे सर्व माझ्या देहामध्ये जात आहे आणि माझ्या सर्व पेशींना आनंद होत आहे’, असे मला जाणवले. ‘या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. हे गुरुदेवा, या क्षुद्र जिवाला हे सर्व अनुभवण्याची संधी दिलीत; म्हणून आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘माझा हा भाव सदैव आपल्या चरणी अर्पण करून घ्या. हा आनंद मला पुनःपुन्हा अनुभवता येऊ द्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. निवेदिता जोशी, नंदुरबार (३०.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |