कोकणातील गणेशभक्तांसाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे प्रवास आणि १ वेळचे जेवण विनामूल्य
सिंधुदुर्ग – गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा सण ! या सणाला जिल्ह्याच्या बाहेर नोकरी, व्यवसाय, शिक्षण यांच्या निमित्ताने गेलेले सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतात. खासगी गाड्या, एस्.टी. बस, आराम बस आदी वाहतुकीच्या साधनांनी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. प्रतिवर्षी या काळात भाविकांची असुविधा होत असते. ही असुविधा ओळखून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या वर्षी कोकणात येणार्यांसाठी विनामूल्य रेल्वेची घोषणा केली आहे.
७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता ही रेल्वे दादर (मुंबई) स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सुटणार आहे. १८ डब्यांची (बोगीची) ही रेल्वे दादर ते सावंतवाडी अशी धावणार आहे. या अंतर्गत पूर्ण प्रवास आणि एकवेळचे जेवण प्रवाशांना विनामूल्य देण्यात येणार आहे. या गाडीच्या आरक्षणासाठी २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत विधानसभेच्या कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील देवगडचे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आणि डॉ. अमोल तेली; वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी अन् कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले आहे.