अमरावती येथे गणेशोत्सव मंडळात यंदाही ४ फुटांचीच श्री गणेशमूर्ती असणार !
कोरोनामुळे मूर्तीकारांना आर्थिक झळ !
अमरावती – कोरोनाचा धोका होऊ नये, यासाठी सरकारच्या वतीने यंदाही कोरोनाचे नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार श्री गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा मोठी नसेल. त्यामुळे मूर्तीकारांनी ४ फुटांचीच मूर्ती सिद्ध केली आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव आणि श्री गणेशमूर्ती खरेदी करण्याला नागरिकांचा उत्साह नसल्याने मूर्तीकारांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
शहरात एकूण २९६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘श्रीं’ची स्थापना केली जाते. यंदा केवळ ५४ गणेशोत्सव मंडळांनाच श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची अनुमती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ सहस्र १५१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी २८९ सार्वजनिक मंडळांनाच श्री गणेशमूर्ती स्थापन करण्याची अनुमती दिली जाणार आहे. याआधी एकाच परिसरात ५ मंडळांत श्री गणेशमूर्तींची स्थापना केली जात होती; मात्र कोरोनामुळे एकाच परिसरात एकाच मंडळाला अनुमती देण्यात आली आहे.
मूर्ती घडवण्यासाठी लागणार्या साहित्यांचे दर वाढले असल्याने त्याचा परिणाम मूर्तींच्या दरावर जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मूर्तींचे दर वाढले आहेत. परंपरागत मूर्ती व्यवसायात असणारे अनेक मूर्तीकार अधिकोषांचे कर्ज घेऊन मूर्ती सिद्ध करण्याचे काम करतात. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शहर आणि जिल्हा येथील गणेशोत्सव मंडळांची संख्या अल्प झाली असल्याने याचा आर्थिक फटका मूर्तीकारांना बसला आहे. शहरात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती सिद्ध आणि विक्री करण्याला येथील महापालिकेने बंदी घातली होती; मात्र मूर्तीकारांनी कोरोना काळातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती. तेव्हा महापालिका प्रशासनाने मूर्तीकारांना दिलासा दिला होता. या वर्षी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीविषयी महापालिकेने अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींविषयीचा पेच कायम आहे.