रुग्णांच्या जिवाशी खेळणारे प्रशासन !
जळगाव जिल्ह्यातील मोहाडी येथील महिला आणि बाल रुग्णालयासाठी अनुमाने पावणे दोन कोटी रुपये मूल्य असलेल्या ३० व्हेंटिलेटर्सची खरेदी करण्यात आली. याविषयी दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार ‘मागवलेले आणि प्रत्यक्षात पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यांमध्ये पुष्कळ तफावत आहे’, असे लक्षात आले. त्यामुळे भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकार्यांनी चौकशीअंती संपूर्ण खरेदी प्रक्रिया रहित करण्याचे लेखी आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले.
या व्हेंटिलेटर्समध्ये पुढीलप्रमाणे तफावत होती. यामध्ये फुफ्फुसासाठी दुहेरी प्रवाह (डबल फ्लो) देण्याची सुविधा नव्हती. आकडेवारी दर्शवणार्या मॉनिटरचा आकार १८ इंचांऐवजी ७ इंचच होता. वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘बॅटरी बॅकअप’ दोन घंट्यांऐवजी एक घंट्याचाच आहे. बिघाड झाल्यास दुरुस्ती कुठे होईल ? याविषयी माहिती दिलेली नाही. ही तफावत पाहिल्यास रुग्णांसाठी महत्त्वाचे असणारे यंत्र अपेक्षित गुणवत्तेचे नसेल, तर त्याचे परिणाम थेट रुग्णांच्या जिवावर बेतणारेच होणार आहेत, याचे गांभीर्य कुणाला नाही का ? असे वाटते. यातून स्वार्थासाठी रुग्णांच्या जिवाचीही पर्वा न करणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भावना किती बोथट झालेल्या आहेत, हे लक्षात येते.
या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी खरेदी प्रक्रिया रहित करण्याचे आदेश दिले असले, तरी तक्रारदार भोळे यांनी ‘दोषींवर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल’, असा पवित्रा घेतला आहे. ‘दोषींवर कारवाई व्हायला हवी’, ही गोष्ट जिल्हाधिकार्यांच्या लक्षात का आली नाही ? असा प्रश्न सामान्यांना पडतो. भोळे यांनी तक्रार केली नसती, तर रुग्णालयात कशा प्रकारचे व्हेंटिलेटर्स आले असते, याचा विचारच करू शकत नाही. ‘व्हेंटिलेटर्सची पडताळणी का झाली नाही ? कि आर्थिक व्यवहारासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे’, याचीही सखोल चौकशी व्हायला हवी. यातून भ्रष्टाचाराची एकही संधी न सोडणारी जनता देशात निर्माण होत आहे, हे चिंताजनक आहे. नीतीमान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता किती आहे ? हेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.
– श्री. नीलेश पाटील, जळगाव