हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आपण अर्जुनाप्रमाणे भक्त होऊया ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
-
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘बलसागर हिंदु राष्ट्र होवो !’ ऑनलाईन कार्यक्रम
-
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
पुणे – धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने अर्जुनाने महाभारतातील युद्ध जिंकले. अर्जुन प्रत्येक बाण सोडतांना श्रीकृष्णाचे नामस्मरण करत असे. आजही हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी क्षात्रतेज अन् ब्राह्मतेज या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना म्हणजेच सत्त्वगुणी लोकांच्या राष्ट्राची स्थापना होय. आपल्यातही सत्त्व गुण वाढण्यासाठी आपणही साधना करायला हवी. साधना करणार्या व्यक्तीकडूनच धर्मकार्य होऊ शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण अर्जुनाप्रमाणे भक्त होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘बलसागर हिंदु राष्ट्र होवो !’ हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा उद्देश समितीचे श्री. विजय चौधरी यांनी स्पष्ट केला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीकडून १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधे विविध ठिकाणी ११५ हून अधिक ठिकाणी ‘ऑनलाईन स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे आयोजन करण्यात आले होते. याच व्याख्यान मालिकेच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ६५० हून अधिक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
भारताला हिंदु राष्ट्र बनवून खर्या अर्थाने सुराज्य स्थापूया ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
१. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश हिंदूबहुल असूनही धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण ‘हिंदु’ ही ओळख गमावून बसलो आहोत. स्वातंत्र्य मिळवूनही गेल्या ७४ वर्षांमध्ये सुराज्य निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो. आपण सर्वांनी आता संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्र बनवून खर्या अर्थाने सुराज्य स्थापूया.
२. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ‘ब्रिटीश इंडिया’ची भूमी वगळून उर्वरित ५५ टक्के भूमीवर ५६६ स्वतंत्र राजसंस्थाने होती. त्यांचे चलन, सैन्य, कायदे सर्वकाही वेगळे होते. त्यांच्यावर ब्रिटिशांचे अधिपत्य नव्हते. ही संस्थाने ‘हिंदु भारत’ बनण्यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतात सामील झाली. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अर्धा भारत स्वातंत्र्यच होता आणि त्याचे कायदेही ‘हिंदु’च होते.
३. सध्याच्या संसदेतील ५० टक्क्यांहून अधिक नेते हे अशिक्षित, जातीयवादी, धनाढ्य किंवा गुंड प्रवृत्तीचे आहेत. अशांची जनहितकारी कायदे बनवण्याची क्षमता आहे का ? कायदे बनवणे, हे तर विद्वानांचे कार्य आहे. गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांकडून सुराज्य कधी निर्माण होईल का ?
४. यावर उपाय म्हणून आपण सर्वांनी एक होऊन संघटितपणे हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी. भारत हा केवळ भौगोलिक सीमेपुरता मर्यादित नसून तो एक हिंदु राष्ट्र आहे आणि म्हणूनच हे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होण्यासाठी देशात रामराज्य आले पाहिजे.