आमचे प्रश्न सुटले नाहीत, तर नितीन राऊत यांचे त्यागपत्र मागू ! – भाई जगताप, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस
स्वपक्षाचे मंत्री असूनही काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन करावे लागणे, याला काँग्रेसमधील दुही म्हणायची कि आंदोलननाट्य ! – संपादक
मुंबई – नितीन राऊत यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती; मात्र त्यांचे आदेशही प्रशासन मानत नाही. नितीन राऊत प्रमुख आहेत. त्यांनी केवळ अधिकार्यांचे कागद पाहून आम्हाला सांगू नये. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नितीन राऊत यांचे त्यागपत्र मागू, अशी चेतावणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. महापारेषण कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी २३ ऑगस्ट या दिवशी भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘बीकेसी’ येथील महापारेषणच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी भाई जगताप म्हणाले, ‘‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा आदेश प्रशासन मानत नाहीत. प्रशासन उद्दाम असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. मंत्र्यांच्या त्यागपत्रापेक्षा आमचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. हे आंदोलन त्यांना चेतावणी देण्यासाठी आहे. कर्मचार्यांच्या प्रश्नांविषयी नितीन राऊत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी समयमर्यादा निश्चित करण्यात आली होती; मात्र २ वर्षे होऊनही प्रश्न सुटलेले नाहीत. बैठकीतील चर्चेविषयी पाठवलेल्या इतिवृत्तांवर प्रशासकीय उत्तरे देण्यात आली. मंत्रीमहोदयांनी प्रशासनाला आदेश देणे अपेक्षित आहे.’’