ढोंगी मुसलमानप्रेम !
संपादकीय
पृथ्वीवरील ५६ इस्लामी देशांपैकी केवळ पाक आणि कतार या देशांनीच आतापर्यंत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणार्या तालिबानला उघडपणे समर्थन दिलेले आहे, तर उर्वरितांपैकी कुणीही उघडपणे तालिबानी सरकारला समर्थन आणि विरोध करण्याविषयी ‘ब्र’ही काढलेला नाही. तालिबानला समर्थन केले, तर जागतिक स्तरावर उत्तर द्यावे लागेल किंवा विविध निर्बंधांना सामोरे जावे लागेल, या भीतीनेच हे इस्लामी देश सध्या गप्प आहेत. या देशांच्या संघटनेनेही यावर मौन बाळगलेले आहे. त्याच वेळी या देशांनी तालिबानचा प्रखर विरोधही केल्याचे दिसत नाही. तालिबानकडून शरीयत कायदा लागू करून त्यानुसार महिलांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे आणि तालिबानचे क्रौर्य त्याच्या मागील राजवटीत अनुभवल्यामुळे सहस्रो अफगाणी नागरिक पलायन करत आहेत, हे या इस्लामी देशांना दिसत असूनही ते याविषयी गप्प आहेत. हे अफगाणी नागरिक मुसलमान आहेत.
एरव्ही जगात कुठेही मुसलमानांच्या विरोधात अन्य धर्मियांनी काही केले, तर पेटून उठणारे मुसलमान याविषयी मौन बाळगून आहेत. रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मुंबईत दंगल करणारे मुसलमानही या अफगाणी नागरिकांवरील अत्याचारांवर गप्प आहेत. उलट काही मौलानांनी तालिबानचे समर्थन केले आहे. अशांना निरपराध अफगाणी मुसलमानांचे दुःख दिसत नाही, असेच म्हणावे लागेल. बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरिन यांनी स्पष्टच सांगितले, ‘मुसलमानांकडून मुसलमानांवर अत्याचार केल्यावर मुसलमान काहीच बोलत नाहीत; मात्र अन्य धर्मियांनी काही केले, तर ते लगेच संघटित होऊन आवाज उठवतात.’ यातून त्यांच्यातील ढोंगी इस्लामप्रेम लक्षात येते. अनेक इस्लामी देशांनी तालिबानमुळे पलायन करणार्या अफगाणी नागरिकांना शरण देण्याचेही नाकारले आहे. अफगाणिस्तानच्या शेजारील इस्लामी देशांनी तर या नागरिकांना रोखण्यासाठी सीमेवर अधिक सैन्य तैनात केले आहे. तुर्कस्तानने तर २९५ किलोमीटर भिंतच उभी केली आहे. यापूर्वी याच इस्लामी देशांनी निर्वासित रोहिंग्यांना आधार देण्याचे टाळले होते. चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांवरही हे इस्लामी देश गप्प आहेत. यातून या देशांना स्वतःच्या मुसलमान बांधवांविषयी किती प्रेम आहे, ते लक्षात येते. भारताने नेहमीप्रमाणे सहिष्णुता दाखवत शेकडो अफगाणी नागरिकांना विमानाद्वारे भारतात आणले आहे. सहस्रो अफगाणी विद्यार्थी काही वर्षांपासून भारतातच शिक्षणासाठी रहात आहेत. आता त्यांचाही व्हिसा वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सरकार तेही पूर्ण करण्याची शक्यता आहे. भारताने मानवता दाखवली आहे, हीच हिंदूंची संस्कृती आहे. हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमान आणि अन्य धर्मियांचे काय होणार ? असा प्रश्न विचारणार्यांना केंद्रातील हिंदुत्वनिष्ठ असलेल्या भाजप सरकारने दिलेली ही चपराक आहे.