परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती हेमलता भगतआजी!

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या आणि दृष्टी नसतांनाही सतत आनंदी असणार्‍या जुन्नर, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती हेमलता भगतआजी (वय ८२ वर्षे) !

श्रीमती हेमलता भगतआजी

१. नीटनेटकेपणा

‘आईंमध्ये नीटनेटकेपणा हा गुण आहे. त्यामुळे त्या प्रतिदिन नीटनेटक्या रहातात. सणाच्या दिवशी त्या आवर्जून ठेवणीतील काठ-पदराच्या साड्या नेसण्यासाठी मागून घेतात.

२. दृष्टी नसतांनाही आनंदी आणि उत्साही रहाणे

वयाच्या ३७ व्या वर्षी आईंची काचबिंदूमुळे दृष्टी गेली, तरीही त्या निराश न होता उत्साहाने आणि आनंदाने दैनंदिन जीवन जगतात. आई घरातील सर्व कामे करण्यासह त्या प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतात.

३. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणे

आई सर्वांचे वाढदिवस लक्षात ठेवतात आणि सर्वांना आवर्जुन शुभेच्छा देतात. साधक घरी आल्यावर आईंना पुष्कळ आनंद होतो. या वयातही त्या सतत इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःही आनंदी रहातात.

४. स्वतःला पालटण्याची तळमळ असणे

आईंकडून एखादी चूक झाल्यास त्या लगेच ती चूक स्वीकारतात आणि ‘माझे चुकले’, असे म्हणतात. त्यांच्यात स्वतःला पालटण्याची तळमळ आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा

५ अ. परात्पर गुरु डॉक्टरांवर असणार्‍या श्रद्धेमुळे आईंना भीती न वाटणे : आई मला सांगतात, ‘‘मला एक अनिष्ट शक्ती त्रास देते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घेतल्यावर ती पळून जाते. मी त्या अनिष्ट शक्तीला सांगते, ‘तुमच्याकडे परात्पर गुरु डॉक्टर बघतील.’’ परात्पर गुरु डॉक्टरांवर असणार्‍या श्रद्धेमुळे आईंना तिची भीती वाटत नाही. आईंना परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून दिसतात आणि त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा आधार वाटतो.

५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण करणे : आईंना देवाची आवड आहे. गेली १० वर्षे त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत आहेत. सध्या आपत्काळ असल्याने विविध नामजप सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी आई स्वतः आठवणीने ‘नामजप पालटायचा का ?’, हे विचारतात. त्या सतत परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करतात.

– सौ. मंजुषा भगत (आजींची सून), जुन्नर, पुणे. (२७.८.२०२०)

६. साधकांना जाणवलेली आजींची गुणवैशिष्ट्ये

६ अ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : ‘आजींचा तोंडावळा नेहमी प्रसन्न असतो. त्यांना ‘डोळ्यांनी दिसत नाही’, याविषयी त्यांची कधीच तक्रार नसते. त्या परिस्थितीचा स्वीकार करून घरातील जमतील तेवढी कामे आनंदाने करतात. ‘नामजप केल्यामुळे मी आनंदी आहे’, असे आजी सांगतात.’

– सौ. स्मिता बोरकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जुन्नर, पुणे.

६ आ. ओळख नसतांनाही अत्यंत प्रेमाने आणि सहजतेने बोलणे : ‘काही मासांपूर्वी मी सत्संगाच्या निमित्ताने भगतआजींच्या घरी गेले होते. तेव्हा आजींना पाहून मला ‘आजी निर्विचार स्थितीत आहेत’, असे वाटले. आजींनी मला जवळ घेतले तेव्हा त्यांचा स्पर्श पुष्कळ प्रेमळ जाणवला. आधीची ओळख नसतांनाही आजी माझ्याशी अत्यंत प्रेमाने आणि सहजतेने बोलत होत्या.’

– कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे. (२७.८.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक