सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणार्‍या पाळधी (जळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुवर्णा साळुंखे (वय ६० वर्षे) !

सौ. सुवर्णा साळुंखे पाळधी (जिल्हा जळगाव) येथील शाळेतून मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना सेवेची तीव्र तळमळ असून त्या कुठल्याही सेवेला कधीही ‘नाही’, म्हणत नाहीत. त्या प्रत्येक सेवा उत्साहाने आणि आनंदाने करतात. त्यांची त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्या घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगातील साधकांना आलेल्या अनुभूती अन् सौ. साळुंखे यांना ईश्वराने रक्षण केल्याची आलेली अनुभूती दिली आहे.

सौ. सुवर्णा साळुंखे

१. नम्रता

‘सौ. सुवर्णा साळुंखेकाकूंच्या बोलण्यात पुष्कळ प्रेमभाव, नम्रता आणि सहजता जाणवते.

२. प्रथमोपचार वर्गात शिकवल्याप्रमाणे तशी कृती शांतपणे करणे

‘एकदा त्या धर्मशिक्षण वर्गाला जातांना पाय घसरून पडल्या. तेव्हा त्यांच्या हाताचे मनगटाजवळील हाड सरकले होते. तेव्हा त्यांनी शांतपणे प्रथमोपचार वर्गात शिकवल्याप्रमाणे लगेच पुठ्ठयाची आधारफळी बसवून आणि दंडझोळी करून हात गळ्यात बांधून घेतला. त्यामुळे त्यांच्या हातावर सूज आली नाही. त्यांच्या हाताचे शस्त्रकर्म झाले असतांनाही त्या स्थिर होत्या आणि तेथे त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

३. शासनाकडून शिक्षकांसाठी तालुका पातळीवर होत असलेल्या शिबिरामध्ये ‘सरस्वती पूजन झाले पाहिजे’, असा त्यांचा आग्रह असायचा.

४. विद्यार्थिनींवर चांगले संस्कार करणे

त्या शाळेत कार्यभार सांभाळत असतांना इयत्ता ५ वी ते ७ वीच्या वर्गातील विद्यार्थिनींना स्वतःकडून झालेल्या चुका लिहायला सांगत. शाळेच्या शेवटच्या घंट्यात विद्यार्थिनी स्वतःकडून दिवसभरात झालेल्या चुका त्यांना सांगत असत.

५. सेवेची तळमळ

अ. शाळेत होणार्‍या पालकसभेत त्या पालकांना ‘कुलदेवता आणि दत्त’ यांच्या नामजपाविषयी सांगत. त्यामुळे काही पालक नामजप करू लागले आहेत.

आ. त्या नोकरी करत असलेल्या शाळेत सनातन संस्थेचे विशेष उपक्रम घेण्यासाठी पुढाकार घेतात.

इ. त्यांच्या ३ – ४ विद्यार्थिनी आधुनिक वैद्या होऊन पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. काकू त्यांना ‘सनातन प्रभात’च्या इंग्रजी पाक्षिकाच्या संकेतस्थळाची ‘लिंक’ पाठवतात.

ई. त्या प्रवचन, धर्मशिक्षण वर्ग किंवा कुठलीही सेवा करायला नेहमीच सिद्ध असतात.’

– श्री. दत्तात्रेय वाघुळदे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), जळगाव

उ. ‘सौ. साळुंखेकाकू कुठलीही सेवा तळमळीने करतात. त्यांना ‘मला जमणार नाही’, असे कधीच वाटत नाही. ‘देव करवून घेणार आहे’, असे वाटून त्या कुठल्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाहीत.

ऊ. त्यांनी भावसत्संगाला अधिकाधिक जिज्ञासू जोडले जाण्यासाठी पुष्कळ चांगले प्रयत्न केले. त्या त्यांचे विद्यार्थी, नातेवाईक आणि मैत्रिणी या सर्वांना सत्संगाचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करतात.

६. भाव

अ. त्यांनी केलेल्या सेवेच्या प्रयत्नांचे सर्व श्रेय त्या परात्पर गुरुदेवांना देतात. त्यांच्या बोलण्यात बर्‍याचदा ‘देवच करतो. गुरुदेवच सर्व करवून घेत आहेत’, असे असते.’

– सौ. जयश्री पाटील (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जामनेर, जळगाव.

आ. ‘त्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण वर्गांमध्ये विषय मांडण्यासाठी सांगितला. तेव्हा त्यांनी ‘गुरुदेवांनीच मला विषय मांडण्याची संधी दिली आहे’, असा भाव ठेवून उत्साहाने ती सेवा स्वीकारली. विषय मांडण्याआधी त्या त्यातील अडचणी समजून घेतात आणि ‘सोप्या भाषेत आणि सर्वांना कळेल’, अशा प्रकारे गती न्यून ठेवून विषय मांडतात.’

– सौ. मीनाक्षी पाटील, जामनेर, जळगाव.

७. सौ. सुवर्णा साळुंखे यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

अ. ‘सौ. साळुंखेकाकूंची आणि आमची ओळख नाही. आम्ही त्यांना पाहिलेही नाही; मात्र त्यांनी पहिल्या दिवशीच घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून आम्हाला ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला हवे’, असे तीव्रतेने वाटू लागले.

आ. काकूंनी ‘नामजप वाढवायला हवा’, असे सांगितल्यापासून माझे बसून नामजप करण्याचे प्रमाण वाढले. मला आधी १० मिनिटेही नामजपाला बसणे अवघड होत असे; मात्र आता माझा ५ घंट्यांपर्यंत बसून नामजप होऊ लागला आहे.

इ. काकूंनी भावजागृतीचे प्रयत्न करायला सांगितल्यावर माझ्याकडून आपोआप तसे प्रयत्न होतात. मार्गाने पायी चालतांना मनात भावजागृतीचा नुसता विचार आला, तरी ‘माझ्या कानात कुणीतरी भावजागृतीचा प्रयोग सांगत आहे’, असे मला जाणवते आणि मला तो प्रयोग पूर्णपणे अनुभवता येतो.

ई. बहुतेक वेळा मला आध्यात्मिक त्रास होत असतो; मात्र त्यांनी साधनेविषयी एखादा लघुसंदेश अथवा संत्संगाची लिंक पाठवली किंवा साधनेची सूत्रे सांगितली की, लगेच माझा त्रास न्यून होतो. त्या सहज जरी आमच्याशी बोलल्या, तरी माझ्यावरील त्रासदायक आवरण न्यून होऊन माझा नामजप चालू होतो.’

– श्री. विशाल पवार

उ. ‘मी साधनेत नवीन असूनही साळुंखेकाकूंनी माझ्या साधनेची घडी बसवली. त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. ‘देव माझ्या समवेत आहे’, हेही मला अनुभवता आल्याने मी माझ्या १० ते १५ मैत्रिणींना सनातनशी, म्हणजे देवाशी जोडण्याचा प्रयत्न करू शकले. त्यातील ८ – ९ जणी आता नामजप करतात. त्या आता सत्संगही ऐकू लागल्या आहेत.

ऊ. काकूंनी ‘बाळाविषयी भाव कसा ठेवायचा ?’, हे शिकवल्यामुळे माझे भावजागृतीचे प्रयत्न आपोआप होऊ लागले. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.’

–  सौ. वैदेही विशाल पवार, जळगाव (जुलै २०२०)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने कठीण प्रसंगात रक्षण झाल्याची सौ. सुवर्णा साळुंखे यांना आलेली अनुभूती

१. विहिणीसह शुक्रताल (उत्तरप्रदेश) येथे तीर्थयात्रेला जाणे, परत येतांना ‘प्लॅटफॉर्म’ पालटण्यासाठी सरकत्या जिन्यावरून जातांना तिघांच्याही दोन्ही खांद्यावर एकेक पिशवी असणे : यजमान, मी आणि विहीणबाई (मुलीच्या सासूबाई) मिळून आम्ही तीर्थयात्रेसाठी शुक्रतालला गेलो होतो. शुक्रतालहून परत येतांना देहलीला आलो. तेथे रेल्वेतून उतरून दुसर्‍या ‘प्लॅटफॉर्म’वर जाण्यासाठी विजेवर चालणारा सरकता जिना आहे. दुसर्‍या ‘प्लॅटफॉर्म’वर जाण्यासाठी त्या जिन्यावरून जावे लागते. यजमान त्या जिन्यावर चढले. त्यांच्यामागे विहीणबाई चढल्या आणि नंतर मी चढले. सामान पुष्कळ असल्यामुळे प्रत्येकाच्या दोन्ही खाद्यांवर ‘बॅगा’ होत्या. माझ्या एका खांद्यावर एक कापडी पिशवी होती आणि दुसर्‍या खांद्यावर ‘बॅग’ होती.

२. विहीणबाईंचा तोल जाऊन त्या साधिकेच्या अंगावर पडणे, तरी विहीणबाई नीट उभ्या रहाणे; मात्र साधिकेचा तोल जाऊन ती पडणे, गुरुकृपेने एका व्यक्तीने जिन्याचे बटण बंद करणे आणि त्यामुळे साधिका जोरात खाली फेकली जाणे : आम्ही त्या जिन्यावर चढल्यावर पुढच्या काहीच क्षणांत विहीणबाई माझ्या अंगावर पडल्या; पण त्या लगेच तोल सांभाळून उभ्या राहिल्या; पण त्यामुळे माझा तोल जाऊन मी गोल फिरले गेले आणि दोन्ही पिशव्यांसहित एकेक पायरी खाली खालीच जाऊ लागले. शेवटी मी खाली पडले. तेव्हा मी ‘प.पू., प.पू.’, अशा जोरात हाका मारत होते. सगळीकडे आरडाओरडा चालू झाला. जिन्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या चेन होत्या. त्यात साडीचा पदर, वेणी, हात, असे काही अडकले असते, तर माझे खरेच तुकडे झाले असते; पण गुरुदेवांच्या कृपेने एक व्यक्ती पळत आली आणि त्याने जिन्याचे बटण बंद केले. जिना तत्क्षणी थांबला आणि मी खाली फेकले गेले.

३. परात्पर गुरु डॉक्टरांचे श्रीकृष्ण रूपातील छायाचित्र असलेले दैनिक समवेत असणे, त्यामुळेच काहीही दुखापत न होता सुरक्षित रहाणे : गुरुदेवांची माझ्यावर एवढी कृपा झाली की, मला साधे खरचटलेही नाही. मी भीतीने थरथर कापत होते; मात्र माझ्या गुरुमाऊलींनी माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही. माझ्या हातातल्या पिशवीत दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक होता आणि त्यात श्रीकृष्णाच्या रूपातील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र होते. मी नेहमी प्रवासात तो अंक माझ्या समवेतच नेते. त्यामुळेच माझे रक्षण झाले.

कृतज्ञता

केवढी ही अगाध कृपा ! त्यांनी मला प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून सोडवले. मी आज जिवंत आहे, ती केवळ गुरुदेवांची अपार कृपा आहे म्हणून. देवा, कशी आणि किती कृतज्ञता व्यक्त करू ? माझ्यासारख्या एका क्षुद्र जिवासाठी तू धावून आलास. यापुढे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या सेवेसाठीच राहील. कोटी कोटी कृतज्ञता भगवंता !’

– सौ. सुवर्णा साळुंखे, जळगाव (जुलै २०२०)