चौकशीची मागणी करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची गुन्हा रहित करण्याची मागणी कशासाठी ?
महाराष्ट्रातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयात प्रश्न उपस्थित !
मुंबई – राज्यातील ‘फोन टॅपिंग’विषयीचा अहवाल आणि त्याविषयीची माहिती संवेदनशील असल्याचे भारतीय पोलीस दलाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी स्वत: मान्य केले आहे. असे असतांना हा अहवाल कुणी उघड केला ? याविषयी चौकशीची मागणी करण्याऐवजी गुन्हा रहित करण्याची मागणी रश्मी शुक्ला कशासाठी करत आहेत ? असा प्रश्न राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट या दिवशी न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती एन्.जे. जमादार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.
या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात भूमिका मांडतांना म्हटले की, अवैध ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात जो गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यामध्ये शुक्ला यांचे नाव नाही. असे असतांनाही रश्मी शुक्ला करत असलेल्या आरोपांवरून त्या स्वत:कडून झालेल्या चुकीची स्वीकृती देत असल्याचे दिसून येते. या प्रकरणातील गुन्हा रहित केल्यास यापुढे अशी संवेदनशील माहिती उघड केली जाईल, असे राज्य सरकारने न्यायालयात म्हटले आहे.