कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार ? – किरीट सोमय्या, माजी खासदार

माजी खासदार किरीट सोमय्या

पनवेल – येथील कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे ६० सहस्र लोकांचे आयुष्य देशोधडीला लागले असून सरकार याकडे बघ्याचीच भूमिका घेत आहे. सरकारने आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष केले असून कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मौन कधी सोडणार ? असा प्रश्न सुप्रसिद्ध सनदी लेखापाल आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी २१ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असले, तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, ठेवीदारांच्या हितासाठी केंद्र सरकारने कारवाई केली; मात्र सरकारने कर्नाळा बँक आणि शेकाप यांना वाचवण्यासाठी अद्याप या घोटाळ्यात कुठलीच कारवाई केली नाही. कर्नाळा बँकेचे माजी अध्यक्ष विवेक पाटील यांची २३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून ते ६५ दिवसांपासून कारागृहात आहेत. ‘सहकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत’, असे खासदार शरद पवार सांगतात, मग राज्य सरकार गप्प का आहे ? शरद पवार कर्नाळा बँकेच्या संदर्भात कधी बोलणार आहेत ? हे राज्य सरकार घोटाळेबाजांचे आहे. मी या सरकारचे अनेक घोटाळे उघड केल्यामुळे माझ्यावर किती आक्रमणे झाली, तरी मी घोटाळेबाजांना सोडणार नाही, अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली.

‘मनी लॉन्ड्रिंग’मुळे विवेक पाटील यांना कारागृहात जावे लागले; मात्र सरकारने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तसेच ‘अंमलबजावणी संचालनालय’(‘ईडी’) जर विवेक पाटील यांना अटक करू शकते, तर राज्य सरकार त्यांच्यावर कुठलीच कारवाई का करत नाही ? येत्या ९० दिवसांत ५ लाख रुपयांच्या आतील रक्कम ठेवीदारांना परत मिळतील. त्यासाठी आमचा कायम पाठपुरावा चालू असून येत्या आठवड्यात त्याचा रितसर अर्ज येथे उपलब्ध करून देणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.