कोरोनाच्या तिसर्या डोसचा आताच विचार करणे मूर्खपणाचे ! – डॉ. रमण गंगाखेडकर, निवृत्त वैज्ञानिक
नागपूर – ‘सध्या देशात न्यूनतम ३२ टक्के लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर केवळ एकच डोस घेणारे २३ टक्के असून दोन्ही डोस घेणारे केवळ ९ टक्के आहेत. असे असतांना तिसर्या डोसचा आताच विचार करणे मूर्खपणाचे आहे’, असे प्रतिपादन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे निवृत्त वैज्ञानिक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एका माध्यमाशी बोलतांना केले. ‘सीरम’ संस्थेचे सायरस पूनावाला यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलतांना ‘कोविशिल्ड’च्या २ डोसनंतर तिसरा ‘बुस्टर डोस’ घेणे आवश्यक असून आपणही तो घेतला आहे’, असे सांगितले होते. यानंतर सर्वत्र लस संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. रमण गंगाखेडकर पुढे म्हणाले की, लस घेण्याविषयी आधीच उदासीन असलेले लोक आणखीच उदासीन होतील. कर्करोग असलेले आणि केमोथेरपीचे उपचार घेत असलेले, ‘एड्स’बाधित अन् मधुमेह बळावलेले अशा काही रुग्णांची प्रतिकारशक्ती अल्प होते. ५-६ मासांनंतर त्यांच्या शरिरातील प्रतिपिंडे अल्प होतात, अशा साधारणत: ६० वर्षांवरील व्यक्तींना तिसरा ‘बुस्टर डोस’ देण्याचा विचार चालू आहे. इतरांसाठी २ डोस पुरेसे आहेत. त्यामुळे तिसर्या डोसचा विचार करणे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यायचा होता. ते अंतर आपण ८४ दिवस केले. तसा तिसरा डोस घ्यावा लागल्यास किती दिवसांच्या अंतराने घ्यायचा ? एकाच लसीचा घ्यायचा कि मिश्र लसींचा घ्यायचा ? त्याची खरंच आवश्यकता आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘क्लिनिकल ट्रायल’विना मिळणार नाही. तोपर्यंत त्याची चर्चा करणेही चुकीचे आहे. दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यामुळे लोकांनी एकदम बेफिकीर न होता कोरोना ‘प्रोटोकॉल’चे कसोशीने पालन करावे, अन्यथा दोन्ही डोस घेतल्यानंतरही नवीन ‘डेल्टा प्लस’ची लागण होऊ शकते. रुग्णसंख्या काही सहस्रांनी अल्प झाली; म्हणून बिनधास्त राहिल्यास परत धोका निर्माण होऊ शकतो.