५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी रवींद्र पेडणेकर (वय २ वर्षे ६ मास) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ओवी रवींद्र पेडणेकर एक आहे !
मूळची पनवेल येथील आणि आता लांजा (जिल्हा रत्निगिरी) येथे रहाणारी चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे, तसेच जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भ ७ आठवड्यांचा असतांना सोनोग्राफी केल्यावर बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे, त्याच वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी एक नामजप करण्यास सांगणे आणि तो नामजप गांभीर्याने केल्यावर बाळाचे ठोके ऐकू येऊ लागणे : ‘गर्भ ७ आठवड्यांचा असतांना माझी सोनोग्राफी केली. तेव्हा गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येणे अपेक्षित होते; मात्र ते ऐकू न आल्याने आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) मला १५ दिवस संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. त्याच सुमारास सद्गुरु अनुताईंनी (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी) मला एक नामजप करण्यास सांगितला. मी तो नामजप गांभीर्याने आणि न चुकता करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील सोनोग्राफीच्या वेळी आधुनिक वैद्यांनी बाळाच्या हृदयाचे ठोके नीट येत असल्याचे सांगितले. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
१ आ. गरोदरपणात केलेली साधना : मी ‘प्रतिदिन नामजप करणे, पोटातील बाळाला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून दाखवणे आणि प्रतिदिन अंतर्मनातून बाळाला घेऊन प.पू. गुरुदेवांना भेटायला जाणे’, यांसारखे साधनेचे प्रयत्न केले.
१ इ. गर्भाशी बोलतांना गुरुमाऊलीची ओळख आणि सनातन संस्थेचे कार्य सांगणे अन् नंतर अष्टांग साधनेविषयी सांगून ‘अष्टांग साधनेतील सूत्रे पूर्ण करण्यासाठी एकमेकांना साहाय्य करूया’, असे सांगणे : ‘आता मला देवाला अपेक्षित असेच व्हायचे आहे. माझे बाळही प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे ‘साधक’ व्हावे’, असे विचार माझ्या मनात तीव्रतेने येत होते. आरंभी ‘गर्भाशी नक्की काय बोलावे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. त्या वेळी देवानेच मला ‘बाळाला साधना सांग’, असे सुचवले. मग मी गर्भाला प.पू. गुरुमाऊलींची ओळख सांगून त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व, सनातन संस्था, तिचे कार्य आणि सनातनचे संत यांच्याविषयी सांगितले. बाळाला गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील सूत्रे सांगतांना माझ्या मनात ‘माझ्याकडूनच वरील सूत्रे पूर्ण केली जात नाहीत’, असा विचार आला; म्हणून मी गर्भाला ‘आता आपण एकमेकांना साधनेसाठी साहाय्य करूया. मी न्यून पडत असेन, तिथे तू मला आठवण करून देत जा’, असे सांगितले.
१ ई. ‘जे स्वभावदोष स्वतःत नाहीत’, असे वाटले होते, तेच स्वभावदोष गर्भारपणात उफाळून येणे आणि त्यामुळे ‘हे बाळ साधना शिकवण्यासाठी जन्माला येत आहे’, असे वाटणे : या पूर्वी अनेक स्वभावदोषांविषयी ‘हे स्वभावदोष माझ्यात नाहीत’, असे मला वाटायचे; मात्र गरोदरपणात माझ्यातील नेमके तेच स्वभावदोष अधिक उफाळून येत होते. अशा प्रकारे देवानेच मला त्या स्वभावदोषांची जाणीव करवून दिली. त्यामुळे ‘मी बाळाला नाही, तर बाळच मला साधना शिकवण्यासाठी जन्माला येत आहे’, असे मला वाटले.
१ उ. पू. भार्गवराम यांच्या संत सन्मान सोहळ्याची ध्वनीचित्र – चकती पहायला मिळणार असल्याचे कळणे, त्या वेळी पुष्कळ आनंद होऊन कृतज्ञता वाटणे आणि कार्यक्रम पहातांना गर्भानेही हालचाल करून प्रतिसाद देणे : ४.११.२०१८ या दिवशी मला सत्संग असल्याचा निरोप मिळाला. तेव्हा मला आनंद वाटला आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. घरातून कार्यक्रमाला निघतांना मी बाळाला म्हणाले, ‘‘आज प.पू. गुरुदेव भेटायला येणार आहेत. आज ते आपल्याला जे देतील, ते आपण कृतज्ञताभावाने स्वीकारूया.’’ सत्संगाच्या ठिकाणी गेल्यावर तेथे सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभू यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात येणार असल्याचे कळले. ते ऐकून मला फार कृतज्ञता वाटली. कार्यक्रम पहातांना ‘देव आपल्याला किती शिकवतो आणि प्रयत्न करण्यासाठी भरभरून साहाय्यही करतो, याची मला जाणीव झाली. कार्यक्रम पहात असतांना ‘गर्भातील बाळाच्या हालचाली नेहमीपेक्षा वाढल्या आहेत आणि कार्यक्रम पाहून गर्भ आनंद व्यक्त करत आहे’, असे मला जाणवले.
१ ऊ. एका प्रसंगाचा ताण आल्यामुळे बाळाची हालचाल मंदावणे, यजमानांनी ‘तुझी आपल्या प.पू. गुरुमाऊलीवर श्रद्धा आहे ना ?’, असे विचारल्यावर मनावरील ताण न्यून होणे आणि नंतर बाळाची हालचाल पूर्ववत् चालू होणे : एकदा सलग २ दिवस बाळाची हालचाल अगदीच मंदावलेली जाणवत होती. ‘नेहमीच सक्रीय असणारे बाळ अकस्मात् शांत कसे झाले ?’, असे मी यजमान श्री. रवींद्र यांना विचारले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘तुला कसला ताण आला आहे का ?’’ तेव्हा मी ‘मला एका प्रसंगाचा ताण आला आहे’, असे सांगितले. त्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुझी प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा आहे ना ? मग तू ताण का घेतेस ?’’ त्यांच्या या वाक्याने मी लगेच अंतर्मुख झाले आणि माझ्या मनावरचा ताण बराच हलका झाला. त्यानंतर बाळाची हालचाल पुन्हा पूर्वीसारखी चालू झाल्याचे लक्षात आले. आम्हा दोघांनाही पुष्कळ आनंद होऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
१ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्याच दिवशी बाळाचा जन्म होणे : ‘बाळाचा जन्म चांगल्या दिवशी व्हावा’, असे मला वाटत होते. १२.२.२०१९ या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सत्संग होता. त्यामध्ये ‘१२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी आश्रमात विविध विधी होणार आहेत आणि त्या दिवसांमधील प्रत्येक क्षण साधकांसाठी आनंदोत्सव असेल’, असे सांगण्यात आले. १९.२.२०१९ या दिवशीचे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मला प्रसववेदना चालू झाल्या. मी पहाटे ५ वाजता रुग्णालयात भरती झाले आणि २०.२.२०१९ या दिवशी दुपारी बाळाचा जन्म झाला.’
– सौ. रेवती पेडणेकर (आई), पनवेल (१४.८.२०२०)
१ ऐ. पत्नीला ज्या रुग्णालयात भरती करण्यात आले, तेथील आधुनिक वैद्य हे प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त असल्याचे कळल्यामुळे आनंद होणे : ‘ज्या रुग्णालयात सौ. रेवती हिचे नाव नोंदवले होते, तेथे तिला रुग्णालयात भरती करण्याच्या वेळी बांधकाम चालू झाले होते. त्यामुळे आम्हाला ऐनवेळी तिला त्याच आधुनिक वैद्यांच्या दुसर्या रुग्णालयात भरती करावे लागले. ते थोडे दूर असल्याने आम्हाला थोडा ताण आला. प्रत्यक्षात नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील स्वागतकक्षातच आम्हाला प.पू. भक्तराज महाराज (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु) यांचे छायाचित्र दिसले. तेव्हा आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले. त्याविषयी विचारपूस केल्यावर ‘आधुनिक वैद्य प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त आहेत’, असे कळले. तेव्हा ‘देवाचे आमच्याकडे लक्ष आहे’, याची जाणीव होऊन आम्हा सर्वांकडून देवाप्रती आणि प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. रवींद्र पेडणेकर (वडील), पनवेल (१४.८.२०२०)
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ३ मास
२ अ १. ‘बाळ १५ दिवसांचे असल्यापासून ते झोपलेल्या ठिकाणी आम्ही नामजप करत असल्यास अनेक वेळा त्याच्या हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा होत होत्या’, असे आमच्या लक्षात आले.
२ अ २. ओवीने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे एकटक बघणे आणि इतरांनी हाका मारल्यावरही तिचे लक्ष विचलित न होणे : एकदा एक साधिका सेवेसाठी आमच्या घरी आली होती. तेव्हा ओवी एकटीच आतल्या खोलीतील पलंगावर होती. आम्ही खोलीत जाऊन पाहिले, तर ती एकटक ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे बघत होती. आम्ही सर्वांनी तिच्या बाजूला उभे राहून अनेक वेळा तिला हाका मारल्या, तरी आम्हा कुणाकडेच लक्ष न देता ती बराच वेळ केवळ प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडेच बघत राहिली.
२ अ ३. ओवी २ मासांची असतांना मी तिला घेऊन वैखरीतून नामजप करत फेर्या मारत असतांना ती लक्षपूर्वक नामजप ऐकायची आणि मधेच हुंकार देऊन प्रतिसादही द्यायची.
२ अ ४. नातेवाइकांकडे न जाता साधकांकडे जाणे : मे २०१९ मध्ये आम्ही एका नातेवाइकांच्या लग्नासाठी १५ दिवस गावी गेलो होतो. तेव्हा ओवी अडीच मासांची होती. त्या वेळी ती काही ठराविक नातेवाईक सोडले, तर अन्य कुणाकडेही गेली नाही. गावाहून मुंबईला परत येतांना आम्ही काही घंट्यांसाठी कोल्हापूर सेवाकेंद्रात गेलो होतो. तिथे मात्र ती आश्रमातील जवळजवळ सर्वच साधकांकडे गेली.
२ अ ५. चि. ओवी प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघत असतांना ‘ती प.पू. गुरुदेवांशी अंतर्मनातून बोलत आहे’, असे जाणवणे : ओवी ३ मासांची झाल्यापासून झोपेतून उठल्यावर तिच्या शेजारी कुणी नसले, तरी न रडता पालथी (पोटावर झोपून) होऊन शांतपणे अर्धा ते पाऊण घंटा प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघत रहायची. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावरचे भाव निराळेच असायचे. बहुतेक वेळा ‘ती प.पू. गुरुदेवांशी अंतर्मनातून बोलत आहे’, असे मला जाणवायचे.
२ आ. वय ४ मास ते ६ मास
२ आ १. समंजस : ओवी ४ मासांची असतांना मी गुरुपौर्णिमेच्या सेवेनिमित्त तिला तिच्या आजीकडे सोडून बाहेर जायचे. त्या वेळी साधारण ५ – ६ घंटेही ती न खाता आणि न रडता आजी-आजोबांच्या समवेत खेळत रहायची.’
– सौ. रेवती पेडणेकर (आई), लांजा (१४.८.२०२०)
(क्रमश: उद्याच्या अंकात)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |