पुणे येथील ‘जेजुरी देव संस्थान’कडून मुख्यमंत्री साहायता निधीस ११ लाखांचा मदतनिधी !
पुणे, २२ ऑगस्ट – राज्यात अतीवृष्टी झाल्यामुळे हानीग्रस्त भागाला राज्यातील सर्व देवस्थानांनी साहाय्य करावे, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त पी.एस्. तरारे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत जेजुरीच्या ‘मार्तंड देव संस्थान’ने ११ लाख रुपयांचे साहाय्य केले असल्याचे संस्थानचे मुख्य विश्वस्त पंकज निकुडे यांनी सांगितले. त्याचसमवेत मार्तंड देव संस्थान आणि तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यासाठी शासनाने साडेतीनशे कोटींचा निधी संमत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही मानण्यात आले. (संकटकाळात हिंदूंची देवस्थाने सढळ हस्ते साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांनी कधी साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही. – संपादक)
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. जेजुरीकरांचे अर्थकारण हे मंदिरावरच अवलंबून असल्याने सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणीही विश्वस्त मंडळाने केली आहे. तसेच संस्थानच्या वतीने लवकरच सर्व सोयीसुविधांयुक्त अद्ययावत् प्रसूतीगृह बांधण्याचा मानस असून या इमारतीच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक निमंत्रित करण्यात आले आहे.