सद्गुरु (सौ.) सखदेवआजी पूर्वी रहात असलेल्या घराची स्वच्छता करतांना लक्षात आलेली महत्त्वाची सूत्रे
संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे महत्त्व
२२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…
‘मिरजेत आमचे वडिलोपार्जित घर आहे. त्या घरात सद्गुरु (सौ.) सखदेवआजी साधारण ५० वर्षे राहिल्या. माझ्या वडिलांच्या निधनानंतर घराची स्वच्छता करणे आणि घरातील सामान आश्रमात देण्यासाठी सिद्ध करणे यासाठी मी, माझा भाऊ आणि वहिनी ६ – ७ दिवस घरी जात होतो. त्या कालावधीत जाणवलेली महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे. त्यावरून संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे महत्त्व लक्षात येते.
१. सध्या माझा भाऊ रहात असलेल्या घरापासून आमचे मिरजेतील घर ८ किलोमीटर दूर आहे. प्रवास करून घरात प्रवेश करताच सर्व थकवा निघून जाऊन मन उत्साही होऊन मनाला पुष्कळ शांत वाटले.
२. घर ३ ते ४ मास पूर्णपणे बंद होते. घरात धूळ होती; पण संपूर्ण घरात कुठेच कुबट वास येत नव्हता. घरात एरव्ही असते, तसे सर्व सामान होते; पण एकही पाल किंवा झुरळ दिसले नाही. साधारण दीड वर्षांपासून वडील आठवड्यातून दोनदा घरी जात असत, तरी उंदीर किंवा तत्सम प्राणी घरात नव्हते.
३. घराची स्वच्छता आणि सामानाचे वर्गीकरण करतांना थकायला झाले नाही. आम्ही प्रतिदिन ८ घंटे सेवा सहजपणे करू शकलो. स्वच्छता करतांना वेळेची जाणीव होत नसे. कंटाळा आला, असेही कधी झाले नाही. सेवा करता करता एका लयीत नामजप होत होता. आम्ही एका खोलीत भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवत असू, तरी घरातील कोणत्याही खोलीत गेल्यास नामजप स्पष्टपणे ऐकू येत असे.
४. एकदा घरी मिरज आश्रमातील साधक आले होते. घरात येताच त्यांचा नामजप चालू झाला. त्यांना घरात पुष्कळ शांत वाटले. यापूर्वीही अनेक साधक घरी आल्यावर सांगत की, घरात पुष्कळ शांत वाटते, प.पू. भक्तराज महाराज यांच्या आवाजात भजने ऐकू येतात इत्यादी. आम्ही स्वच्छता करत असतांना शेजारी रहाणारे काही जण आले. त्यांनीही घरात पुष्कळ शांत वाटत असल्याचे सांगितले. ‘बरेच दिवस घरात कुणी रहात नाही’, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
५. घरातील वस्तू पाहून पूर्वीच्या आठवणी येऊन भावनाशील व्हायला झाले, असे एकाही प्रसंगात झाले नाही. उलट ‘प्रत्येक वस्तू योग्य त्या ठिकाणी (परात्पर गुरु डॉक्टरांच्या आश्रमात त्यांचा चरणांशी) जात आहे. त्यासाठीची काही सेवा करायला मिळत आहे’, या जाणिवेने पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘सर्व साहित्यही आनंदात आहे’, असे वाटत होते.
६. एके दिवशी घरातील रद्दी एकत्र करून झाली आणि त्याच वेळी रद्दी विकत घेणारा दारावर आला. आमचे घर बोळात आत आहे. हव्या त्या वेळी रद्दीवाला येणे, हे देवाचेच नियोजन.
७. घरातील नको असलेले, टाकून देण्याजोगे सामान, कचरा आम्ही पोत्यात भरून ठेवत होतो. माझा भाऊ ते बाहेर टाकण्यासाठी जाणार, तोच शेजारच्या घरातील मुलगा आपण होऊन आला आणि ‘मी कचरा टाकून येतो’, असे म्हणाला. जेव्हा जेव्हा आम्ही घरी गेलो, त्या वेळी तो मुलगा कचरा टाकण्यासाठी येत असे. देवच सर्व साहाय्य करत असल्याचे अनुभवले आणि देवाप्रती कृतज्ञता वाटली.
देवा, प्रत्येक प्रसंगात किती करतोस ? हे सर्व तुझेच आहे. तूच सर्व करतोस, ही जाणीव होऊन मन भरून येते.’
– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |