मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात चौथा गुन्हा नोंद !

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बिमल अग्रवाल या व्यापार्‍याने परमबीर सिंह यांच्या विरोधात ९ लाख रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी २० ऑगस्टच्या रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह आणि अल्पेश पटेल यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसुली केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची चौकशी सध्या चालू असून या प्रकरणी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले. यानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधातही खंडणी वसुलीच्या तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून, तर परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांचे महाराष्ट्र पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.