संघकार्य वाढवण्याचा संकल्प ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ करायचा आहे !
‘भारतमाता की जय संघा’च्या वतीने २२ ऑगस्टला होणार्या पणजी येथील ‘हिंदु रक्षा अधिवेशना’च्या निमित्ताने…
गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा पणजीच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात चालू झाली. त्या पहिल्या शाखेचा स्वयंसेवक बनण्याचे भाग्य मला लाभले आणि आयुष्य एकदम पार पालटून गेले. जीवन जगण्याचा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन मिळाला. जून १९६२ मध्ये गोव्यात रा.स्व. संघाचे काम चालू झाले. त्याला येत्या जून २०२२ मध्ये ६० वर्षे पूर्ण होणार आहेत; म्हणजे गोव्यातील संघकामाची षष्ट्यब्दिपूर्ती !
वर्ष २०१२ मध्ये गोव्यातील रा.स्व. संघाच्या कामाला ५० वर्षे पूर्ण झाली. काही कारणास्तव त्या वेळी आमची रा.स्व. संघाच्या कामाची ५० वी वर्षपूर्ती साजरी करणे हुकले होते. आता वर्ष २०२२ मध्ये संघकामाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने तरी कार्यवाढीसाठी मुसंडी मारण्याचे ‘भारतमाता की जय संघा’ने ठरवले आहे. संकटे, जाणूनबुजून निर्माण करण्यात येणारे अडथळे, सूड, धमक्या, दहशत, बळजोरी या सगळ्यांना पुरून उरून प.पू. डॉ. हेडगेवार (रा.स्व. संघाचे संस्थापक), प.पू. श्रीगुरुजी (द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी) आणि पू. बाळासाहेब देवरस यांचा आदर्श, तंत्र अन् विचार यांनुसार निष्ठेने, निर्धाराने संघकार्य वाढवण्याचा संकल्प २२ ऑगस्ट २०२१ या दिवशी सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ आम्हाला करायचा आहे.
गोव्याच्या संघकामाची ६० वर्षे आणि रा.स्व. संघाचे संस्थापक प.पू. डॉ. हेडगेवार यांनी निर्मिलेल्या आपल्या संघाची स्थापना-शताब्दी आणखी ४ वर्षांनी; म्हणजे वर्ष २०२५ मध्ये होणार आहे. या संघायुष्यातील ऐतिहासिक घटनांना साजेसा संकल्प, आपण ४ वर्षांच्या कालावधीकरता या अधिवेशनात करणार आहोत.
– प्राचार्य सुभाष वेलिंगकर, राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवा.