नामजपाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी भावपूर्ण ध्वनीमुद्रण करवून घेणारे आणि ते सर्वांना उपलब्ध करून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘१४ मे २०२१ आणि २० जून २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपांच्या संदर्भातील चौकट प्रकाशित करून त्याची प्रथम ओळख करून देण्यात आली होती. या नामजपांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ते भावपूर्ण पद्धतीने कसे म्हणावेत ? यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रित करण्यात आले. हे ध्वनीमुद्रण करत असतांना कु. तेजल पात्रीकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
१. २१ मे २०२१ – आरंभी ‘निर्विचार’ नामजप करतांना ‘विचार कसे न्यून होतील ?’, असा विचार करून बुद्धीने जप करण्याचा प्रयत्न करणे
‘ आरंभी ‘निर्विचार’ हा नामजप कसा म्हणावा ?’, हे मला कळत नव्हते. ‘निर्विचार’ हा निर्गुण नामजप असल्याने तो भावाच्या स्तराच्याही पुढे असेल, त्यातून शांतीची स्पंदने असायला हवीत’, असा माझा विचार होता. त्याप्रमाणे मी आरंभी ‘निर्विचार’ नामजप करतांना ‘माझे विचार कसे न्यून होतील आणि त्यानंतर हा नामजप चांगला होईल’, असा प्रयत्न करत होते. त्या वेळी माझ्याकडून बुद्धीने प्रयत्न होत होते.
२. २२ मे २०२१ – ‘निर्विचार’ नामजप निर्गुण असल्याने एका लयीत म्हणण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
संगीताच्या दृष्टीने मी हा नामजप लयीत म्हणून पाहिला. तो ऐकून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निरोप पाठवला, ‘‘हा नामजप निर्गुण असल्याने याला संगीताप्रमाणे लय नको. या नामजपाची लय वर-खाली न करता तो एका लयीत म्हणायला हवा.’’
३. २५ मे २०२१ – परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन नामजप करायला लागल्यावर नामजपात भाव जाणवणे
मी परात्पर गुरु डॉक्टरांना आणखीन शरण जाऊन नामजप करायला लागले. एक दिवस नामजप ऐकल्यावर ते म्हणाले, ‘‘आता यामध्ये भाव जाणवायला लागला आहे.’’ त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टरांना नामजप भावपूर्णच म्हणणे अपेक्षित आहे’, हे लक्षात आले.
४. २६ मे २०२१ – परात्पर गुरु डॉक्टरांची सर्वज्ञता अनुभवणे
हा नामजप लवकर होणे अपेक्षित होते; परंतु ‘माझे प्रयत्न अल्प होत आहेत. मला जमत नाही’, असे विचार माझ्या मनात आले अन् मी रडले. त्या दिवशी ‘जपाचे ध्वनीमुद्रण मला नीट जमले नाही’, असा माझा आढावा मी एका साधकाला सांगितला. त्याने तसे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ‘कु. तेजल निराश नाही ना झाली ?’, असे त्यांनी विचारले आणि ‘असू दे जमेल’, असे सांगून मला प्रोत्साहनही दिले. ‘या प्रसंगात मी रडले’, हे केवळ मलाच ठाऊक होते; परंतु त्यांनी त्या साधकाला मला विचारायला सांगितले की, ‘ती रडली तर नाही ना ?’ यावरून ते सतत माझ्या समवेतच आहेत आणि त्यांच्या सर्वज्ञतेची अनुभूती त्यांनी मला या प्रसंगात दिली.
५. २७ मे २०२१
५ अ. परात्पर गुरुदेव दुरुस्त्या सांगून रडवत नाहीत, तर ते आपल्याला घडवतात ! : मी केलेला नामजप ध्वनीमुद्रीत करून त्यांना प्रतिदिन ऐकवायचे. त्यात ते पालट सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या पालटाप्रमाणे जप ध्वनीमुद्रित करून परत त्यांना ऐकवायचे. ते प्रतिदिन दुरुस्त्या सांगायचे. त्यामुळे ते एका साधकाला म्हणाले, ‘‘सतत दुरुस्त्या सांगून मी तेजलला रडवतो ना ? तिला विचार.’’ त्या वेळी माझ्या वतीने त्या साधकानेच परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले की, ‘तुम्ही रडवत नाही, तर दुरुस्त्या सांगून आम्हाला घडवता.’
५ आ. नामजप करतांना ठेवायचा भाव : २७ मे २०२१ या दिवशी ‘नामजप करतांना ‘त्याचा शरणागत भावाने शब्दोच्चार करून जप देवाच्या चरणी अर्पण करत आहे’, या भावाने जप केल्यास त्यात भाव येतो’, अशा प्रकारे भाव ठेवून जप करण्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले.
५ इ. ध्वनीमुद्रणासाठी ‘निर्विचार’ हा जप म्हणत असतांना ‘निर्विचार ध्यानावस्था’ अनुभवणे आणि काळानुसार हा जप परिणामकारक असल्याची अनुभूती येणे ः या दिवशी ध्वनीमुद्रणासाठी ‘निर्विचार’ हा जप करत असतांना अशी वेळ आली की, मला पुढे जप म्हणता येईना आणि काही वेळ प्रयत्न करूनही डोळेही उघडता येत नव्हते. त्या वेळी मी ‘निर्विचार ध्यानावस्था’ अनुभवली. या अनुभूतीतून ‘काळानुसार असणारा हा जप किती परिणामकारक आहे ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला शिकवले.
६. ३० मे २०२१ – परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘निर्विचार’ जपाच्या उच्चाराविषयी मार्गदर्शन करून भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्यास सांगणे
आरंभी या नामजपातील प्रत्येक अक्षर कसे उच्चारायचे ? कोणत्या पट्टीत तो म्हणायचा ? प्रत्येक अक्षरावर किती जोर द्यायचा ? इत्यादी दुरुस्त्या सांगून परात्पर गुरूंनी माझ्याकडून प्राथमिक भाग पक्का करून घेतला. त्यानंतर ३० मे २०२१ या दिवशी त्यात भाव आणण्याच्या प्रयत्नावर भर देण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, ‘‘भावामुळे ऐकणार्यालाही आवाजातील गोडवा जाणवतो.’’
७. १ जून २०२१
७ अ. भाव जागृत होण्यासाठी भजन ऐकणे आणि कृतज्ञतेचा भाव जागृत झाल्यावर ‘निर्विचार’ जपाचे ध्वनीमुद्रण करणे ः परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझा भाव जागृत कशाने लवकर होऊ शकतो ?’, याचा मी अभ्यास केला. त्या वेळी अकस्मात् ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ (अर्थ- माझे अहोभाग्य की, मला ही सेवा मिळाली) हे भजन मनात आले. ते ऐकल्यावर मनात कृतज्ञतेचा भाव जागृत होऊन मला रडायला आले. हे भजन ऐकून मग मी ‘निर्विचार’ जपाचे ध्वनीमुद्रण करत असे.
७ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ शरणागतीने प्रार्थना करणे, भावजागृती होणे आणि निश्चय करून ध्वनीमुद्रित केलेल्या नामजपातील एक नामजप अंतिम होणे ः या दिवशी ध्वनीमुद्रणाच्या आधी भजन ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ शरणागतीने मी प्रार्थना करत होते की, ‘मला काहीच येत नाही, एवढा उच्च स्तराचा हा नामजप आहे आणि माझ्यासारख्या पामराकडून (क्षुद्र जिवाकडून) आपण हा करवून घेत आहात. ही माझ्यावर आपण केलेली कृपाच आहे. हा नामजप आपणच कसा म्हणायचा ? तो म्हणवून घ्यावा.’ त्या वेळी वाटले, ‘खरंच माझ्यावर श्रीविष्णु अवतारी गुरुमाऊलीची किती कृपा आहे !’ या विचारांमुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. भावजागृती झाल्यावर मी ध्वनीमुद्रणाला आरंभ केला. ‘आज कितीही विलंब झाला, तरी ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रण करूयाच’, असे आतून वाटत होते. या वेळी ध्वनीमुद्रण केलेल्या नामजपांतीलच एक नामजप परात्पर गुरु डॉक्टरांनी अंतिम केला.
८. १८ जून २०२१ – या नामजपात भाषाशास्त्रानुसार शब्दोच्चार केल्यास निर्गुण स्थिती अनुभवता येत नसल्याने ‘निर्विचार’ मधील ‘नि’ थोडे दीर्घ म्हटले असणे
‘संस्कृत शास्त्रानुसार शब्दोच्चार करतांना ‘निर्विचार’मधील ‘नि’चा र्हस्व उच्चार व्हायला हवा. त्याप्रमाणे म्हटल्यावर हा जप जरा गतीत म्हटला जातो. या गतीमुळे निर्गुण स्तर अनुभवता येत नाही. त्यामुळे निर्गुण स्थितीत जाण्यासाठी ‘नि’चा थोडा दीर्घ उच्चार या जपासाठी योग्य आहे’, असे स्पंदनांचा अभ्यास करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले.
अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिनांक २१ मे २०२१ ते १८ जून २०२१ असे सुमारे ४ आठवड्यांमध्ये ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नम:’ हे तीनही नामजप अंतिम करून घेतले.
९. ‘निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हे दोन्ही नामजप केल्यावर ‘निर्विचार’ जप म्हटल्याने मन लवकर निर्विचार होऊन ध्यानावस्थेत जाणे
‘निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नम: ।’ या दोन्ही नामजपांचा मी तुलनात्मक अभ्यास केल्यावर ‘निर्विचार जप म्हटल्याने मन लवकर निर्विचार होऊन ध्यानावस्थेत जाते’, असे अनुभवले. ‘श्री निर्विचाराय नम: ।’ म्हणतांना आरंभी थोडे सगुणात आल्यासारखे वाटते. त्यानंतर निर्विचार अवस्थेकडे जातो’, असे अनुभवले.
‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेने हे सर्व आम्हाला शिकता आणि अनुभवता येत आहे. तुमच्या कृपेमुळेच या सेवेची संधी मिळाली आहे. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच असणार आहे.’
– कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.६.२०२१)
केवळ ‘नामस्मरण करा’, असे न सांगता ‘भावपूर्ण नामजप केल्याने अधिक लाभ होईल’, हे शिकवून त्याचे ध्वनीमुद्रणही उपलब्ध करून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !‘अनेक संप्रदायातील गुरु किंवा संत समाजाला ‘नामस्मरण करा’, असे सांगतात; परंतु ‘नामस्मरण कसे केल्यास त्या नामस्मरणाचा अधिक लाभ होईल’, हे कुणीही सांगतांना दिसत नाही. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांना काळानुसार नामस्मरण करायला सांगतात आणि ‘तो नामजप भावपूर्ण कसा करू शकतो ?’, हे शिकवून साधकांना तसा नामजप उपलब्धही करून देतात. त्यामुळे साधकांची त्या जपातून भावजागृती होऊन त्यांना त्या जपाचा अधिक लाभ करून घेता येतो.’ – कु. तेजल पात्रीकर |