सक्राळ, पेडणे येथे ‘लिफ्ट’ दिलेल्या दुचाकीस्वाराचा खून करून सोनसाखळी पळवली संशयित पोलिसांच्या कह्यात
पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.)- सक्राळ, पेडणे येथील चंद्रकांत बांदेकर यांनी चालू मासाच्या प्रारंभी दुचाकीवरून जातांना एका अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ (वाटेत भेटलेल्याला दुचाकीवरून पुढे सोडणे) दिली. या अनोळखी व्यक्तीने वाटेत चंद्रकांत बांदेकर यांचा खून करून त्यांची सोनसाखळी पळवली. पोलिसांनी संशयित जयपुरी गोसावी याला कर्णावती, गुजरात येथील त्याच्या रहात्या गावातून कह्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार चंद्रकांत बांदेकर यांचा मृतदेह मोपा येथे जंगलात २ जुलै या दिवशी सापडला होता. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ फूटेज (चित्रीकरण) मिळाले. यामध्ये बांदेकर त्यांच्या ‘ॲक्टीवा’ दुचाकीवर संशयिताला बसवून नेतांना दिसत आहेत. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी कर्णावती, गुजरातस्थित जयपुरी गोसावी याला त्याच्या रहात्या गावातून कह्यात घेतले. संशयित जयपुरी याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.
संशयित जयपुरी पोलिसांना म्हणाला, ‘‘मी जून २०२१ पासून गोव्यात वास्तव्यास होतो. पैसे नसल्याने गुजरात येथे परतण्याचा मी निर्णय घेतला. वाटेत बांदेकर यांच्याकडे मी दुचाकीवरून पुढे सोडण्यास साहाय्य मागितले. वाटेत बांदेकर यांनी गळ्यात घातलेली सोनसाखळी पाहून मला मोह आवरला नाही आणि माझ्या हातून हा प्रकार घडला. बांदेकर यांना भोसकून ठार मारून त्यांचा मृतदेह मी मोपा येथील जंगलात टाकला आणि सोनसाखळी घेऊन पळालो.’’ उत्तर गोवा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संशयित जयपुरी याला कह्यात घेतले.